सप्टेंबरमध्ये 202 दशलक्ष मेट्रीक टन मालवाहतूक : अदानी सोलर क्षमता वाढवणार
वृत्तसंस्था / मुंबई
अदानी समूहातील कंपनी अदानी पोर्ट्स यांच्या मालवाहतुकीत आर्थिक वर्ष 2023-24 वर्षात विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. सदरच्या अवधीत कंपनीने 202.6 दशलक्ष मेट्रीक टन मालाची वाहतूक करण्यात यश मिळवलं आहे. 200 दशलक्ष मेट्रीक टनचा टप्पा पहिल्या 6 महिन्यातच गाठला आहे. वर्षाच्या आधारावर मालवाहतुकीत कंपनीने 26 टक्के इतकी वाढ या अनुषंगाने नोंदवली आहे. या बातमीने शेअरबाजारात अदानी पोर्ट्सचे समभाग 1 टक्के इतके एनएसईवर वाढत इंट्रा डे दरम्यान 835 रुपयांवर पोहचले होते. सर्व बंदरातून जवळपास मालवाहतुकीत दुप्पट वाढ कंपनीने नेंदवली असल्याचे कंपनीने सांगितले.
अदानी सोलर 10 गीगावॅटपर्यंत क्षमता वाढवणार
अब्जाधिश उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी सोलर एनर्जीने आगामी काळात म्हणजेच 2027 पर्यंत सौर ऊर्जा उत्पादन क्षमता 10 गीगावॅटपर्यंत वाढवणार असल्याचे समजते. सध्याला कंपनीची सौर ऊर्जा उत्पादन क्षमता 4 गीगावॅट इतकी आहे. नव्या सोलर निर्मिती युनिटच्या माध्यमातून उत्पादन वाढवले जाणार आहे. याकरीता कंपनी आगामी काळात 13 हजारहून अधिक उमेदवारांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करणार आहे. कंपनीकडे 3 हजार मेगावॅट ऊर्जा निर्यात करण्याची ऑर्डर सद्यस्थितीत आहे. हे काम पुढील 15 महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. अलीकडेच याकरीता कंपनीने बार्कलेज पीएलसी व डॉयचे बँक यांच्या माध्यमातून 394 दशलक्ष डॉलरची रक्कम उभारली आहे.
सौर ऊर्जा उत्पादन लक्षणीय वाढ
भारतात मार्च 2014 मध्ये सौर ऊर्जा उत्पादन क्षमता 2.63 गीगावॅट इतकी होती जी जुलै 2023 मध्ये वाढून 71.10 गीगावॅट इतकी झाली आहे. अशावेळेला निर्मिती वातावरणात अधिक सुसह्याता आणण्याची गरज असून सरकारने पीएलआय सारख्या प्रोत्साहनात्मक योजनेचा लाभ कंपनीला मिळवून दिला आहे.









