गिनिज बुकमध्ये तिसऱयांदा नाव झाले नोंद
भारतीय वंशाचे कॅनडाचे नागरिक सरवन सिंह सध्या एका विशेष कारणामुळे जगभरात चर्चेत आहेत. स्वतःच्या दाढीमुळे त्यांना ही प्रसिद्धी मिळाली आहे. सर्वाधिक लांब दाढीचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदविला गेला आहे. त्यांच्या दाढीची लांबी 8 फूटाहून अधिक आहे. सरवन सिंह जेथे कुठले जातील, तेथे त्यांची दाढी ‘टॉक ऑफ द टाउन’ ठरते. सलग तिसऱयांदा त्यांनी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळविले आहे.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या शर्यतीत स्वीडन आणि कॅनडाच्या काही लोकांनी भाग घेतला होता, परंतु सरवन हेच यात अव्वल राहिले आहेत. 2008 साली त्यांची दाढी 2.33 मीटर म्हणजेच 7 फूट 8 इंच इतकी लांब होती. तर 2010 मध्ये रोममधील लो शो देई यांनी या विक्रमाला आव्हान दिल्याने सरवन यांच्या दाढीची लांबी पुन्हा मोजण्यात आली असता ती 2.362 मीटर म्हणजेच 7 फूट 9 इंचाची आढळून आली.

15 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची दाढी 2.54 मीटर लांबीची होती. सरवन यांनी स्वतःची दाढी वयाच्या 17 व्या वर्षापासून कधीच कापलेली नाही. ही दाढी देवाची देणगी असल्याचे ते सांगतात. दाढीची लांबी ती ओली असतानाच मोजली जाते. दाढीतील केस कुरळे असले तरीही त्याच्या लांबीवर कुठलाच परिणाम होत नाही आणि योग्य आकार समजत असल्याने ही प्रक्रिया राबविली जाते.
सरवन हे स्वतःच्या दाढीची मोठी देखभाल करतात. त्याकरता त्यांचा मोठा नित्यक्रम आहे. दाढीचे केस मोकळे केल्यावर ते एका टबमध्ये ठेवून ओले करतात. त्यानंतर शॅम्पू किंवा कंडिशनरचा वापर केला जातो. दाढीचे केस ओले केल्यावर ते सुकण्यास सुमारे 10 मिनिटांचा कालावधी लागतो. त्यानंतर दाढीच्या केसांना तेल लावून ते विंचरले जातात. याकरता त्यांना इतरांची मदत घ्यावी लागते.
माझ्या दाढीवर माझे प्रेम असून ती टिकवून ठेवण्यास मला कधीच अडचण आली नाही. तरीही एखादी समस्या उदभवल्यास ती मी सहजपणे सोडविली आहे. माझी दाढी अधिक लांब व्हावी अशी इच्छा असल्याचे सरवन यांनी गिनिज बुकच्या टीमशी बोलताना म्हटले आहे.









