कार्गो सेवेतून 3.3 हजार कोटींचा महसूल जमा : यंदा 11.8 टक्के वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
भारतीय रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न हे मालवाहतुकीतून मिळते. नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने 2021-22 या आर्थिक वर्षात रेकॉर्डबेक कमाई केली आहे. 33.49 लाख टन मालाची वाहतूक करून त्यातून 3.3 हजार कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. 2020-21 च्या तुलनेत यावषी तब्बल 11.8 टक्के इतकी वाढ झाली आहे.
हुबळी विभागात 9.547 लाख टन कच्चे लोखंड, 8.78 लाख टन कोळसा, 8.27 लाख टन स्टीलच्या वस्तूंची वाहतूक करण्यात आली. या वाहतुकीतून 3 हजार 333.36 कोटी रुपयांचा महसूल नैर्त्रुत्य रेल्वेकडे जमा झाला आहे. मागीलवषी 2 हजार 690 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. मार्च 2022 हा महिना नैर्त्रुत्य रेल्वेसाठी सर्वात महत्त्वाचा ठरला. या महिन्यात 363 कोटी रुपयांची कमाई रेल्वेकडे जमा झाली आहे.
रेल्वेकडून केली जाणारी प्रवासी वाहतूक ही सेवा म्हणून केली जाते. त्यातून रेल्वेला तितकेसे मोठे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे रेल्वेचे उत्पन्न हे माल वाहतुकीवरच अवलंबून आहे. कोरोना काळापासून रेल्वेच्या मालवाहतुकीला उत्तम प्रतिसाद मिळू लागल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने माल वाहतुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे.
या साहित्याची होतेय वाहतूक
नैर्त्रुत्य रेल्वे विभागात अनेक मोठे औद्योगिक प्रकल्प असल्याने कच्च्या लोखंडाची सर्वाधिक वाहतूक होते. याचबरोबर कोळसा व स्टीलच्या वस्तूंचीही वाहतूक होते. साहित्यासोबतच धान्य, सिमेंट, वाहने, भाजीपाला यांची वाहतूक वाढल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेने म्हटले आहे.









