1500 चा टप्पा गाठला : मलकापुरी रताळी 800 ते 900 रु. तर जवारी रताळी 400 ते 600 रु.
वार्ताहर /कंग्राळी खुर्द
यावर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी हंगामातील रताळी आवकेने जवळपास 1500 चा टप्पा गाठला. बेळगाव बाजारच्या 40 वर्षांच्या इतिहासातील विक्रमी आवक झाली. त्याचा भाव मलकापुरी रताळी 800 ते 900 रु. तर जवारी रताळी 400 ते 600 रु. पर्यंत विक्री झाली. बेळगाव परिसराबरोबरच महाराष्ट्रातील कराड, राधानगरी या ठिकाणी या हंगामातील रताळी लागवड केली जाते. मात्र, चव आणि रंग यामध्ये बेळगावची रताळी सरस ठरत असल्याची माहिती जाणकार व्यापारी बांधवांनी दिली. देशात रताळी उत्पादनात बेळगाव, चंदगड आणि खानापूर तालुका अव्वल उत्पादन घेतो. मात्र, त्याचबरोबर उन्हाळी लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या वर्षी याच हंगामात 400 ते 500 पोती आवक होत होती. मात्र यावर्षी चंदगड तालुक्यामधून तुरळक प्रमाणात तर बेळगाव तालुक्यातील कडोली, जाफरवाडी, आंबेवाडी, उचगाव या परिसरातून मोठ्या प्रमाणात रताळी लागवड करण्यात आली आहे. उपवासासाठी याचा उपयोग केला जातो. त्यामुळे मुंबई, नाशिकनगर, जळगाव येथील व्यापारी रताळी खरेदीसाठी आषाढी वारी कालावधीत ठाण मांडून आहेत. शिवाय स्थानिक व्यापारीसुद्धा ऑर्डरीप्रमाणे मालाची निर्यात करत असतात. आठवड्याभरात 300 रु. वाढ झाली असल्याने रताळी उत्पादक शेतकरी भलताच खूष असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. शनिवारी शेवटचा बाजार होणार आहे. त्यामुळे दरात वाढ होणार असल्याची चर्चा व्यापारी वर्गामध्ये दिसत होती.









