चिपळूण :
पिंपळी येथील जुन्या दगडी पुलाच्या पुनर्बाधणीसाठी निधी मंजूर होऊन पुढील प्रक्रिया सुरू असतानाच शनिवारी हा पूल खचला. परिणामी या मार्गावरील गावांचा संपर्क तुटला. यामुळे जीर्ण पुलांच्या दुरुस्तीची चर्चा सुरू असतानाच गेल्या पाच वर्षात आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून तालुक्यात तब्बल ३५ धोकादायक पुलांना नवसंजीवनी मिळाली आहे. यासाठी राज्य शासनाबरोबरच नाबार्डमधून ७० कोटीचा निधी आणण्यात आमदार निकम यांना यश आले आहे.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील डोंगर-दऱ्यांमधील गावोगावी जोडणारे पूल जनजीवनाचा थागा आहे. अनेक ठिकाणी असलेले हे पूल जीर्णावस्थेत असल्याने नागरिकांना धोक्याचा सामना करावा लागत होता. मात्र आमदार निकम यांनी अनेक पुलांची कामे केलेली आहेत. त्यामुळे शनिवारी पिंपळी- नांदीवसे या मुख्य रस्त्यावरील खचलेला पूल व परिसराचा तुटलेला संपर्क यानंतर पूल दुरुस्तीची चर्चा होत असली तरी तालुक्यातील बहुतांशी पुलांची यापूर्वीच उभारणी पूर्ण झाली असल्याचे बांधकाम विभागाने दिलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
यामध्ये आकले, दादर, पेढांबे, नागावे, सावर्डे, डेरवण, कोसबी, आंबतखोल, नांदगांव, ओवळी, नांदीवसे, अलोरे, शिरगांव, कुटरे, खेर्डी-टेरव, येगांव, कुशिवडे, तळवडे, सावर्डे कासारवाडी, हडकणी, अलोरे, दुर्गवाडी, असुर्डे आदी पुलांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच शनिवारी कोसळलेल्या पिंपळी पुलाच्या पुनर्बाधणीसाठीही २०२२पासून आमदार निकम यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि निचीही मंजूर झाला आहे. पुलाची उभारणीही एमआयडीसीकडून करण्यात येणार असल्याने त्या विभागाकडून पुढील प्रक्रिया सुरू आहे. पेढांबे अलोरे, शिरगांव रस्त्यावरील पेढांबे फाटा येथील पूल उभारणीचे काम निविदास्तरावर आहे. दळवटणे मोरवणे रस्त्यावरील मोठ्या पुलासाठी ३.८५ कोटी रुपये मंजूर आहेत. मात्र त्याचा खर्च पाच कोटीपेक्षा अधिक गेल्याने हा निधीही पडून आहे. शिरगांव पूल व रस्ता महामार्ग विभागाकडे हस्तांतरीत झाल्याने रखडला आहे.
- माझं राजकारण घोषणांचं नाही
माझं राजकारण हे घोषणांचं नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवणारं आहे. ३५ पुलांची पुनर्बाधणी आम्ही पूर्ण केली आणि उर्वरित कामंही वेळेत वेळेत पूर्ण करू जनतेच्या सुरक्षिततेसाठी मी सतत प्रयत्नशील राहीन.
– शेखर निकम, आमदार








