सर्वोच्च न्यायालयाचा झटका
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना त्यांच्या पुनर्विचार याचिकेबाबत गुऊवारी सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सिसोदिया यांची पुनर्विचार याचिका फेटाळली. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी 29 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. 30 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने मद्य धोरण प्रकरणात सिसोदिया यांना जामीन देण्यास नकार दिला होता. या आदेशाचा फेरविचार करण्याची मागणी ते करत होते. त्यांना या वषी 26 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या अबकारी धोरण प्रकरणात कथित भूमिकेसाठी अटक करण्यात आली होती. अटकेपासून सिसोदिया कोठडीत आहेत. अटक झाल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. दिल्ली सरकारने 17 नोव्हेंबर 2021 रोजी नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सप्टेंबर 2022 च्या अखेरीस ते रद्द करण्यात आले होते.









