धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
हिंदू मंदिरांवर व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचे आदेश हे या मंदिरांवर अन्याय करणारे आहेत. नेहमी हिंदू मंदिरांनाच लक्ष्य करून त्यांच्यावर अन्याय केला जातो. याबाबत धर्मादाय खात्याने पुनर्विचार करावा, अशी विनंती करून कपिलेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यातील 49 मंदिरांवर व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय धर्मादाय खात्याने घेतला. कपिलेश्वर देवस्थानसह जिल्ह्यातील अन्य मंदिरांवर अशी समिती बसविली जाणार आहे. याबाबत हे निवेदन देण्यात आले. कपिलेश्वर मंदिर आणि सर्वच मंदिरांच्यावतीने राकेश कलघटगी यांनी शशिकला जोल्ले यांच्याकडे निवेदन दिले. हा कायदा रद्दबातल करण्यात आला होता. परंतु तो पुन्हा का लागू केला जात आहे? सरकार आम्हाला कोणत्याही प्रकारचे अनुदान देत नाही आणि वेगवेगळी जाचक नियमावली लागू करते. हा हिंदू मंदिरांवर अन्याय आहे. त्यामुळेच अशा समित्या स्थापन करण्याची गरज नसून त्याबाबत पुनर्विचार करावा, असे कलघटगी यांनी निदर्शनास आणून दिले. सुवर्णविधानसौध येथे शशिकला जोल्ले व आण्णासाहेब जोल्ले या दोघांचीही भेट घेऊन त्यांनी हे निवेदन दिले.









