इरोड पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी ः भाजपचा यशस्वी पुढाकार
वृत्तसंस्था/ चेन्नई
एडप्पादी पलानिस्वामी गटाचे ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कडगमचे (अण्णाद्रमुक) उमेदवार के.एस. थेनारासू यांनी इरोड पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी स्वतःचा अर्ज भरला आहे. या उमेदवाराला भाजपने पाठिंबा दर्शविला आहे. ओ. पन्नीरसेल्वम गटाने निवडणुकीत उमेदवार उभा न केल्याने पलानिस्वामी गटासोबत त्याची समेट झाल्याचे मानले जात आहे.
द्रमुकविरोधी मते अण्णाद्रमुकच्या दोन्ही गटांमध्ये विभागली जाऊ नये म्हणून भाजपने विशेष प्रयत्न केले आहेत. भाजपने अण्णाद्रमुकच्या दोन्ही गटांमध्ये तात्पुरती तडजोड घडवून आणली आहे. याचमुळे ओ. पन्नीरसेल्म गटाने स्वतःचा उमेदवार माग घेतला आणि ईपीएस गटाने स्वतःचा उमेदवार आणि निवडणूक चिन्ह कायम ठेवले.
तामिळनाडूचे भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी थेनारासू यांना पाठिंबा देण्याच्या निर्णयाची घोषणा केली. तसेच रालोआच्या हिताकरात उमेदवार मागे घेतल्याने ओपीएस गटाचे आभार मानले आहेत. याचबरोबर अण्णाद्रमुकमधून बाहेर पडलेला आणखी एक गट अम्मा मक्कल मुनेत्र कडगमने (एएमएमके) टीटीव्ही दिनाकरन यांच्या नेतृत्वात देखील स्वतःचा उमेदवार मागे घेण्याची घोषणा केली. निवडणूक आयोगाने एएमएमकेच्या उमेदवाराला कुकर हे चिन्ह न दिल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता. एएमएमकेने मागील विधानसभा निवडणूक याच चिन्हावर लढविली होती. परंतु यामागेही भाजपचेच प्रयत्न कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
2017 मध्ये ईपीएस आणि ओपीएस गटाला एकजूट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱया भाजपने मागील 6 महिन्यांपासून परस्परांशी संघर्ष करणाऱया नेत्यांपासून अंतर राखले होते. परंतु 3 फेब्रुवारी रोजी भाजपचे महासचिव सी.टी. रवि यांनी अन्नामलाई यांच्यासोबत ईपीएस आणि ओपीएस या दोघांचीही भेट घेतली होती. या बैठकीत ओपीएस गटाला स्वतःचा उमेदवार मागे घेण्यासाठी तयार करण्यात आल्याचे समजते.
ईपीएस आणि ओपीएस दोघांनीही आमच्या सूचना मान्य केल्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तामिळनाडूत रालोआचे नेतृत्व अण्णाद्रमुक करणार असल्याचे भाजपच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. इरोड पूर्व मतदारसंघात 27 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे.









