वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष हॉकी या क्रीडा प्रकारात भारताला कास्य पदक मिळवून देणाऱ्या हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रित सिंग याच्या नावाची शिफारस आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 2024 च्या हंगामातील सर्वोत्तम हॉकीपटूसाठी करण्यात आली आहे.
28 वर्षीय हरमनप्रित सिंगने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना 8 सामन्यातून सर्वाधिक म्हणजे 10 गोल नोंदविण्याचा पराक्रम केला आहे. 2020 ते 22 या कालावधीत हरमनप्रित सिंगने आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचा वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटूचा पुरस्कार सलग दोनवेळा मिळविला आहे. आता हॉकी इंडियाने या पुरस्कारासाठी हरमनप्रित सिंगच्या नावाची शिफारस केली आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कार शर्यतीमध्ये भारताचा हरमनप्रित सिंग तसेच हॉलंडचे ब्रिंकमन व डेल मॉल त्याच प्रमाणे जर्मनीचा हॅनेस मुल्लेर व इंग्लंडचा वॉलेस यांचा समावेश आहे.









