वृत्तसंस्था/ दुबई
2022 च्या क्रिकेट हंगामातील आयसीसीच्या सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंच्या पुरस्कारासाठी दक्षिण आफ्रिकेची शबनिम इस्माईल, न्यूझीलंडची अष्टपैलू ऍमेलिया केर, इंग्लंडची नॅट स्किव्हेर आणि ऑस्ट्रेलियाची ऍलिसा हिली यांच्या नावांची शिफारस करण्यात आल्याची घोषणा गुरुवारी आयसीसीच्या प्रवक्त्याने केली आहे.
दक्षिण आफ्रिकेची आणि वयस्कर महिला क्रिकेटपटू शबनिम इस्माईलची 2022 सालातील कामगिरी यापूर्वीच दर्जेदार झाली आहे. चालू वषीच्या सुरुवातीलाच तिने विंडीज विरुद्धच्या मायदेशातील सामन्यामध्ये दोनवेळा प्रत्येकी 4 बळी मिळविले होते. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तिची कामगिरी कौतुकास्पद झाली होती. 34 वषीय शबनिमने न्यूझीलंडमधील या स्पर्धेत 17.50 धावांच्या सरासरीने 14 गडी बाद केले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तिने हॅमिल्टनमध्ये 27 धावात 3 गडी बाद करत आपल्या संघाला उपांत्यफेरीपर्यंत नेले होते.
न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू ऍमेलिया केर हिची 2022 च्या क्रिकेट हंगामातील कामगिरी समाधानकारक झाली असून तिने गोलंदाजी आणि फलंदाजीतही दर्जेदार कामगिरी केली आहे. भारताविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडच्या केरने 1 शतक आणि 3 अर्धशतके नोंदविली होती. मात्र त्यानंतर झालेल्या न्यूझीलंडमधील आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तिची फारशी चांगली कामगिरी झाली नव्हती. 2022 या वर्षामध्ये तिने फलंदाजीत 204 धावा तर गोलंदाजीत 9 बळी मिळविले आहेत.
इंग्लंडची महिला क्रिकेटपटू नॅट स्किव्हेरची महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील कामगिरी निश्चितच दर्जेदार झाल्याचे जाणवते. तिने या संपूर्ण स्पर्धेत 70 धावांच्या सरासरी 436 धावा जमविल्या होत्या. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तिने काही कालावधीसाठी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा क्रिकेट क्षेत्रात पुनरागमन केले आणि तिच्या दर्जेदार कामगिरीमुळे इंग्लंडने विंडीज महिला संघाचा त्यांच्या मायदेशात 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेत स्किव्हेरने 60 धावांच्या सरासरीने 180 धावा जमविल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाची हंगामी कर्णधार ऍलिसा हिली हिची 2022 च्या क्रिकेट हंगामातील कामगिरी बऱयापैकी झाली आहे. चालू वषीच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ऍशेस मालिकेत हिलीने चांगली कामगिरी केली होती. गेल्या मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हिलीने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 28 तर त्यानंतर पाकविरुद्धच्या सामन्यात 72 धावा तसेच न्यूझीलंड आणि विंडीजविरुद्धच्या सामन्यात अनुक्रमे 15 आणि 3 धावा जमविल्या होत्या. भारताविरुद्धच्या प्राथमिक गटातील सामन्यात हिलीने 65 चेंडूत 72 धावांची खेळी केली होती.









