वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीतर्फे पुरूष आणि महिलांच्या क्रिकेट विभागात क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आढावा घेत प्रत्येक महिन्यामध्ये सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड केली जाते. आता 2023 च्या जुलै महिन्यातील सर्वोत्तम पुरूष क्रिकेटपटूंच्या पुरस्काराकरिता अॅशेस मालिकेत दर्जेदार कामगिरी करणाऱ्या इंग्लंडच्या झेक क्रॉले आणि ख्रिस वोक्स यांची नावांची शिफारस करण्यात आल्याची माहिती आयसीसीच्या प्रवक्त्याने दिली आहे.
नुकत्याच झालेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस कसोटी मालिकेत इंग्लंडच्या क्रॉलेने आपल्या फलंदाजीत सातत्य राखले आहे. ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात क्रॉलेने 182 चेंडूत 189 धावांची खेळी केली होती. हेडींग्लेच्या कसोटीत त्याने पहिल्या डावात 33 तर दुसऱ्या डावात 44 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर त्याने पुढील कसोटीत पहिल्या डावात 22 तर दुसऱ्या डावात 73 धावा जमवित इंग्लंडला या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधून दिली. अॅशेस मालिकेत क्रॉलेने 58.85 धावांच्या सरासरीने 412 धावा जमविल्या असून त्यामध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज वोक्सने अॅशेस मालिकेतील तिसऱ्या सामन्यात महत्त्वाची दर्जेदार कामगिरी केली. 34 वर्षीय वोक्सने ऑस्ट्रेलियाच्या लाबूसेनला लवकर बाद केले. त्यानंतर त्याने हेड आणि मार्स यांना बाद करून ऑस्ट्रेलियाला 263 धावांवर रोखले होते. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात त्याने 3 गडी बाद केले होते. तर मार्क वूडसमवेत फलंदाजी करताना त्याने नाबाद 32 धावा जमवित आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. वोक्सने मँचेस्टरच्या कसोटीत 5 गडी तर अंतिम कसोटीत 7 गडी बाद केले. त्याने या मालिकेत एकूण 19 बळी मिळविले.









