वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीतर्फे 2022 च्या क्रिकेट हंगामातील डिसेंबर महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कार शर्यतीमध्ये आता न्यूझीलंची अनुभवी सुझी बेटस्, इंग्लंडची अष्टपैलू चार्ली डीन आणि ऑस्ट्रेलियाची गार्डनर यांचा समावेश आहे. या तीन खेळाडूंची डिसेंबर महिन्याच्या मासिक पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
डिसेंबरमध्ये झालेल्या क्रिकेटच्या अतिजलद प्रकारामध्ये वरील तीन महिला क्रिकेटपटूंची कामगिरी दर्जेदार झाली. बांगलादेश विरुद्ध झालेल्या वनडे आणि टी-20 मालिकेत सुझी बेटस्च्या शानदार फलंदाजीमुळे न्यूझीलंड महिला संघाला या दोन्ही मालिका जिंकता आल्या होत्या. बेटस्ने टी-20 मालिकेत 23.33 धावांच्या सरासरीने 70 धावा जमवल्या होत्या. तर त्यानंतर झालेल्या वनडे मालिकेत तिची कामगिरी अधिकच सरस झाली. हॅमिल्टनमध्ये या मालिकेतील झालेल्या अंतिम सामन्यात बेटस्ने अर्धशतक झळकवले होते. तसेच वेलिंग्टनच्या सामन्यात तिने नाबाद 93 धावा जमवल्या होत्या.
इंग्लंडची चार्ली डीन हिच्या नावाची या मासिक पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. विंडीजच्या दौऱयावर इंग्लंडच्या महिला संघाची कामगिरी दर्जेदार झाली होती. या दोन्ही मालिकेत चार्ली डीनने 18 गडी बाद केले होते. तीन समन्यांच्या वनडे मालिकेत तिने 7 बळी मिळवले होते. तसेच तिने टी-20 मालिकेत 11 गडी बाद केले होते.
या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले गार्डनरने भारताविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत दर्जेदार कामगिरी केली होती. या मालिकेत गार्डनरला मालिकावीर म्हणून घोषित केले होते. ऑस्ट्रेलियाने भारताचा या मालिकेत 4-1 असा दणदणीत पराभव केला होता. टॉप सिडेड गार्डनरने या मालिकेत 115 धावा झळकवल्या होत्या. तसेच तिने गोलंदाजीतही उपयुक्त कामगिरी केली होती.









