सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचा प्रस्ताव : केंद्र सरकार घेणार निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
घरात कोट्यावधींच्या नोटा सापडल्यामुळे सध्या देशभर चर्चेत असलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांची बदली करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केली आहे. त्यांना दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात पाठविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून आता केंद्र सरकार त्यावर अंतिम निर्णय घेणार आहे. याचदरम्यान न्यायमूर्ती वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या निर्णयावर अलाहाबाद उच्च न्यायालय बार असोसिएशनने आक्षेप घेतला आहे.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी लागलेल्या आगीनंतर रोख रकमेच्या जप्तीच्या कथित घटनेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आरोपांची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ न्यायाधीशांची तीन सदस्यीय समिती स्थापन केली असून ही समिती संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. ही चौकशी सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची त्यांच्या मूळ न्यायालयात म्हणजेच अलाहाबाद उच्च न्यायालयात परत बदली करण्याची शिफारस करणारा ठराव जारी केला आहे.









