आणखी एक विद्यार्थी अवजड वाहनाचा बळी : भाऊ-बहिणीच्या दुचाकीला ट्रकची धडक, दोघे जखमी : कॅम्प परिसरात तणाव-दगडफेक
प्रतिनिधी /बेळगाव
भरधाव ट्रकने विद्यार्थिनीला चिरडल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी कॅम्प परिसरात आणखी एक अपघात घडला. लोखंडवाहू ट्रकची दुचाकीला धडक बसून विद्यार्थी जागीच ठार झाला तर त्याच्या बहिणीसह दोघेजण जखमी झाले. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करून काचा फोडल्या. चालकाला चोप देण्यात आला. या घटनेने परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळेच अशा अपघातांची पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
अरहान फारुकअहम्मद बेपारी (वय 10, रा. मटण बुचर स्ट्रीट, कॅम्प) असे अपघातात जागीच ठार झालेल्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव असून तो इस्लामिया हायस्कूलचा विद्यार्थी होता. त्याची बहीण अतिका ऊर्फ हपसा फारुकअहम्मद बेपारी (वय 18) ही जखमी झाली आहे. याचवेळी या मार्गावरून जाणारा आयुष सचिन आजरेकर (वय 12, रा. भाग्यनगर) हा ज्योती सेंट्रल स्कूलचा विद्यार्थीही जखमी झाला आहे.
जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. बेळगाव-खानापूर रोडवरील कॅम्प येथील वेलकम हॉटेलजवळ बुधवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, एसीपी शरणाप्पा, वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, इतर अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ऍक्टीव्हावरून अतिका ऊर्फ हपसा ही तरुणी आपल्या भावाला शाळेला सोडण्यासाठी जात होती. कॅम्प येथील आपल्या घरातून ती इस्लामिया हायस्कूलकडे निघाली होती.
महावीर जनरल स्टोअर्सजवळ रस्ता ओलांडण्यासाठी ती उभी होती. त्यावेळी लोखंडवाहू भरधाव ट्रकची एका कारला धडक बसून रस्ता ओलांडण्यासाठी कडेला उभ्या असलेल्या दुचाकीलाही ट्रक धडकला.
या अपघातात अरहान जागीच ठार झाला. आपल्या भावाला शाळेला सोडून अतिका कॉलेजला जाणार होती. त्याआधीच हा अपघात घडला. याचवेळी आयुष सचिन आजरेकर (वय 12) हा विद्यार्थीही जखमी झाला आहे. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी दोन्ही बाजूने बॅरिकेड्स उभे करून वाहतूक वळविली.
अरहानचे वडील फिशमार्केटमध्ये मासळी विकण्याचा व्यवसाय करतात. कॅम्प परिसरात त्यांचे घर आहे. मुलाच्या अपघाती निधनाने आई-वडिलांना मोठा धक्का बसला असून या धक्क्मयाने कोसळलेल्या वडिलांना स्थानिक नागरिकांनी धीर दिला. ट्रकचालकाचा हलगर्जीपणा, बेफाम वाहन चालविण्याचे प्रकार, ट्रकचा वेग आदी कारणांमुळे हा अपघात घडला आहे.
ट्रकचालकाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत होता. कारला ठोकरून ट्रकची दुचाकीला धडक बसली. त्यानंतरही चालकाचे ट्रकवरील नियंत्रण बसले नव्हते. हा प्रकार लक्षात घेऊन जवळच असणारे समीर बसरीकट्टी यांनी चालकाला ट्रकमधून उतरवून हॅण्ड ब्रेक लावला व ट्रक उभी केली. महावीर जनरल स्टोअर्स समोरच नाला आहे. या नाल्यातून ट्रकची चाके गेली आहेत.
जनरल स्टोअर्सच्या भिंतीला ट्रक आदळली असती तर काही घरांचेही नुकसान झाले असते. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास करण्यात येत आहे. ज्या कारला ट्रकची धडक बसली त्या कारमध्ये चार महिला प्रवास करीत होत्या. सुदैवाने त्यांना कोणतीच इजा पोहोचली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुटुंबीयांचा आक्रोश
घटनास्थळी कुटुंबीयांचा एकच आक्रोश सुरू होता. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अरहानचे वडील तर अक्षरशः कोसळले. नागरिकांनी त्यांना धीर दिला. त्यांच्या आईचा आक्रोश हृदय पिळवटणारा होता. नागरिकांनी ऑटोरिक्षातून त्यांना घरी पाठविले. अरहानची आजी खैरुनिसा, आत्या बेबीजान यांना अरहान अपघातात दगावला हे सत्य मान्य नव्हते. त्यांचा आक्रोश पाहून इतर महिलांनाही अश्रू अनावर झाले. गर्दीतील प्रत्येक जण हळहळत होता. वेळीच अवजड वाहनांना आवार घातला नाही तर अशा अपघातांची मालिका थांबणार नाही. त्यामुळे आता तरी प्रशासनाने आवर घालण्याची मागणी करण्यात येत होती.
आमदारांनी केली घटनास्थळाची पाहणी
बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सकाळी 10.30 वाजता आमदारांचे आगमन होताच संतप्त नागरिकांनी पोलीस दलाबद्दल त्यांच्याकडे तक्रारी केल्या. अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली नाही तर असे अपघात घडतच राहणार आहेत. याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले.
पोलीस प्रशासनाला वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे कधी जमणार आहे?
अरहानला दोन मोठय़ा बहिणी आहेत. त्यांच्यानंतर दहा वर्षांनी अरहानचा जन्म झाला. त्यामुळे कुटुंबात अरहान सर्वांचा लाडका होता. घटनास्थळी आलेली त्याची बहीण भांबावून गेली होती. या अपघातानंतर महिलांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासन आणि पोलिसांच्या नावाने शिमगा केला. छोटय़ा-मोठय़ा कारणावरून वाहनधारकांना अडविणाऱया पोलीस प्रशासनाला वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे कधी जमणार आहे? असाही प्रश्न उपस्थितांनी केला.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आमदार अनिल बेनके म्हणाले, फोर्ट रोड पाठोपाठ कॅम्प परिसरातही अवजड वाहनाच्या ठोकरीने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे साहजिकच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. खानापूर रोडच्या दोन्ही बाजूंनी कॅम्प परिसरात वेगवेगळय़ा शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे गतिरोधक बसविण्याबरोबरच शाळेच्या वेळेत वाहतूक पोलीस तैनात करण्याची नागरिकांची मागणी जुनीच आहे. यासंबंधी आपण पोलीस अधिकाऱयांना सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. आमदार अनिल बेनके यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. मात्र ही दुर्घटना घडल्याचे कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. या समस्येचे त्वरित निराकरण केले जाईल व कार्यवाही झाली नाही तर मला केव्हाही संपर्क करा, अशी ग्वाही त्यांनी दिली.
चालकाला चोप…
संतप्त जमावाने ट्रकचालकाला चोप दिला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत त्याला ताब्यात घेतले आहे. शाळकरी मुलाच्या मृत्यूने जमाव आणखी संतप्त झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱयांनाही धारेवर धरण्यात आले. प्रत्येक बैठकीत वाहतूक समस्येविषयी आम्ही अधिकाऱयांचे लक्ष वेधतो. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला.