विविध समस्यांचे निवारण करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजाविलेल्या एम. जी. हिरेमठ यांची प्रादेशिक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे प्रादेशिक आयुक्तांची भेट अखिल भारतीय मजदूर संघटनेच्यावतीने घेवून स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी स्वच्छता कामगारांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
एम. जी. हिरेमठ यांच्या प्रादेशिक आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल संघटनेच्यावतीने भेट घेवून अभिनंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यरत असताना स्वच्छता कामगारांच्या समस्यांसंदर्भात अनेकवेळा चर्चा करण्यात आली होती. पण स्वच्छता कामगारांच्या समस्यांचे निवारण झाले नाही. त्यामुळे या भेटीप्रसंगी कामगारांच्या समस्यांचा मुद्दा चर्चेत आला. स्वच्छता कामगारांना हक्क पत्र देण्यात आले. पण काही दिवसांत महापालिकेने सदर हक्कपत्र माघारी घेतले आहेत. त्याचप्रमाणे स्वच्छता कामगार क्वॉर्टर्समध्ये वास्तव्यास असलेल्या निवृत्त कामगारांकडून घरभाडे वसूल करण्याचा प्रकार महापालिकेने चालविला आहे.
मॅन्युअल स्कॅव्हेंजर अंतर्गत सर्व्हे करण्यात आलेल्या स्वच्छता कामगारांना अद्यापही ओळखपत्र देण्यात आले नाही. तसेच स्वच्छता कामगार भरती प्रक्रिया रखडली असल्याचे प्रादेशिक आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या समस्यांकडे लक्ष देवून निवारण करण्यात यावे, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
या भेटीप्रसंगी अखिल भारतीय मजदूर काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष दीपक वाघेला, जनरल सेक्रेटरी विजय निरगट्टी, गौरवाध्यक्ष मुनीस्वामी भंडारी, खजिनदार एस. एन. आदियांद्रा, कार्यकारी सेक्रेटरी राममोहन साके, महिला विभागाच्या मालती सक्सेना, कुमार हरिजन, अरुणा साके, रुक्मिणी बळ्ळारी, विठ्ठल तळवार आदींसह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.









