संधी मिळताच घरफोडी : परजिल्ह्यांतूनही गुन्हेगारांची आयात : वैभवनगर, उद्यमबाग झोपडपट्ट्यांमधील संशयितांवर लक्ष
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. माळमारुती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून चोरीचे प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याच प्रकरणातील आणखी एक संशयित फरारी आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात एपीएमसी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली होती. रमजान अब्दुल नदाफ (वय 19), शाहिद शब्बीर शेख (वय 19) दोघेही राहणार सत्यसाई कॉलनी, न्यू वैभवनगर अशी त्यांची नावे आहेत. 26 जानेवारी 2024 रोजी सदाशिवनगर परिसरात त्यांनी केलेल्या एका घरफोडीचा छडा लावण्यात आला. पोलिसांनी या जोडगोळीकडून 52 हजार रुपये किमतीचा एक लॅपटॉप व 600 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. रमजान व शाहिद हे दोघे स्टेशनरी विकतात. स्टेशनरी विकण्याच्या निमित्ताने दिवसभर शहरातील वेगवेगळ्या भागात त्यांचा संचार असतो. विक्रीच्या निमित्ताने फिरताना हे दोघे बंद घरांची पहाणी करायचे. घराला कुलूप असल्याचे दिसून आले की कडीकोयंडा तोडून चोरी करायचे.
बुधवार दि. 14 फेब्रुवारी रोजी माळमारुती पोलिसांनी अटक केलेल्या इरफान खताल शेख (वय 30) व अर्जुन कल्लाप्पा नायक (वय 30) हे दोघेही सत्यसाई कॉलनी, वैभवनगर येथील राहणारे आहेत. त्यांचा एक प्रमुख साथीदार ख्वाजा अस्लम सय्यद (वय 34) हाही सत्यसाई कॉलनीचा राहणारा असून चोरीसाठी तो हुबळी-धारवाडहून गुन्हेगारांना बेळगावला बोलावतो. एखाद्या घरफोडीनंतर दागिन्यांची विक्री करून आलेल्या पैशातून गोव्यात जाऊन चैनी करतो. कॅसिनोमध्ये चोरीतील पैसा उधळतो. त्याला जुगाराचाही नाद आहे. त्याची 2 ते 3 कुटुंबे आहेत. तो वारंवार पत्ता बदलत असतो. माळमारुती पोलिसांनाही तो हवा आहे. त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री शिवबसवनगर येथील एका डॉक्टरच्या घरात चोरी करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या छबीवरून ही कारवाई केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत माळमारुती व एपीएमसी पोलिसांनी सत्यसाई कॉलनी, वैभवनगर येथील दोघा जणांना अटक केली आहे. वाढत्या चोऱ्या व घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर वैभवनगर, उद्यमबाग परिसरातील झोपडपट्ट्यांमधील संशयितांवर लक्ष ठेवण्यात आले असून ख्वाजा शेखला अटक झाल्यानंतर अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.









