कोल्हापूर / संतोष पाटील :
अगदी मोजक्या शब्दांत राजकीय विरोधकाला नामोहरम करुन त्याची राजकीय वाटचाल बिकट करण्याची ताकद असलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मागील दोन दिवसांचा दौरा तसा रुक्षच गेला. वय आणि दुखणं याचा परिणाम त्यांच्या भाषणातून प्रकर्षाने जाणवला. विधानसभा निवडणुकीच्या परिणामाची छाप त्यांच्या दौऱ्यावर दिसली. शरद पवारसाहेब आले आणि गेले, कोणताही राजकीय खळखळाट नाही, की चर्चा नाही, असे कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात प्रथमच घडले. त्यांचे राजकारण आणि समाजकारणातील योगदान पाहता त्यांची छाप असलेला शरद ऋतू कायम राहीलच, पण तो ओसरला की काय, असे म्हणावे इतके भासमान वातावरण त्यांच्या दौऱ्यात दिसले, हे मात्र तितकेच खरे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जनतेच्या दरबारात जात राज्याचे राजकारण तापवले. अगदी एक–दोन मात्र गर्भित वाक्यात समोरच्याला गारद करण्याचा वकुब असलेल्या पवारांच्या ‘रडार’वर केंद्र आणि राज्य सरकारसह जिह्यातील त्यांना सोडून गेलेले नेते होते. शरदअस्त्राने होणारी जखम सांगताही येणार नाही अन् सोसणार नाही, अशी अवस्था संबंधितांची झाली होती. पितृस्थानी म्हणून पुजलेल्या शरद पवार यांच्यावर पलटवार करणे अशक्य असल्याने शरदअस्त्राची भळभळती जखम घेऊनच हे नेते निवडणुकीला सामोरे गेले. त्यामुळे शरद पवार यांचा दौरा आणि त्यांच्या जोडण्या दौऱ्याअगोदर आणि नंतरही चर्चेचा विषय ठरत असत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन–चार नव्हे; तर अडीच–पावणेतीन डझन आमदारांनी ‘दगा’ देऊन भाजपसोबत ‘घरोबा‘ केल्यावरही न डगमगलेले या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता पक्ष उभारण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला. आठवड्याला दोन जिल्हे फिरून ते 12-15 विधानसभा मतदारसंघांत फिरले. फुटलेल्यांना निवडणुकीत गारद करण्याच्या हेतूने पवार जुन्या–जाणत्यांच्या भेटी घेऊन नवे राजकारण घडवणार असल्याचे संकेत देत राजकीय हवा तापवली होती.
ऐन पावसाळ्dयात निघणाऱ्या पवारांच्या दौऱ्याकडे साऱ्या राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य कुतूहलाने पहात होते. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होते, कानोसा घेत होते. मागील 50 वर्षात ते राज्यभर फिरताना पवारांच्या ‘रडार’वर कोण असतील, याचेही संकेत ते देत होते. आपल्या वाढत्या वयाचा दाखला दिला तर महागात पडेल, असा इशारा ते विरोधकांना देत होते. शरद पवार यांचा दौरा त्यांच्या विरोधकांच्या उरात धडकी भरवणारा तर समर्थकांना उर्मी देणारा असे.
मात्र, अजित पवार यांच्या बंडाने कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला एकसंघ राहिला नाही. मंत्री हसन मुश्रीफांसह बहुसंख्य नेते अजित पवार यांच्या छावणीत दाखल झाले. कोल्हापूर जिह्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. जिल्हा एकसंघपणे पवारांच्या पाठीशी कधी राहिला नसला तरी जिह्यातील दहा विधानसभा आणि दोन लोकसभा मतदारसंघातील निकालाचे काटे फिरवण्याची ताकद शरद पवार यांच्यात होती. ती राजकीय ताकद दुभंगली की त्यात सहानुभुतीमुळे वाढ होइल, ही आशाही विधानसभा निवडणुकीच्या निकालाने धुळीस मिळवली.
शरद पवारांच्या एका वक्तव्यावर कोल्हापुरातील निवडणुकांचा रंग बदललेला आहे. 2004 आणि 2009 च्या लोकसभा निडणुकीत ‘म्हातारा बैल’ आणि ‘कौन है ये मुन्ना’ ही वाक्ये दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रचारार्थ व विरोधातील सभेत निकालाचे पारडे फिरवणारे ठरली होती. शरद पवार यांच्या वक्तव्यांची आजही कोल्हापुरात चर्चा आहे. पवार आणि कोल्हापूरचे जिव्हाळ्याचे असलेले नाते लोकसभा निवडणुकीत ‘स्वाभिमाना’च्या टप्प्यावर आले. तो जोर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कायम राहिला. परंतु निकालाने शरद पवार यांची निराशा केली.
बिंदू चौकात 2009 मध्ये पुन्हा शरद पवार यांची सभा झाली. यावेळी सदाशिवराव मंडलिक यांचा उल्लेख ‘म्हातारा बैल’ असा पवारांनी केला. पवारांचे हे वक्तव्य मंडलिकांसाठी तारक ठरले होते. या निवडणुकीतील पराभवानंतर प्रतिक्रिया देताना, लोकसभा निवडणुकीत माझी ‘गंमत’ केली. गंमत करणाऱ्यांना विधानसभेच्या निवडणुकीत दाखवू, असे सूचक विधान शरद पवारांनी केले अन् खरेही करून दाखवले होते. त्यामुळेच कोल्हापूरच्या दौऱ्यात शरद पवार काय बोलणार, याबाबत कमालीची उत्सुकता असे, ती उत्सुकत। तो जोश या दौऱ्यात दिसला नाही. विधानसभा निवडणुकीचा पराभव हे कारण नसले तरी त्यांची प्रकृती अस्वास्थ्य हे एक प्रमुख कारण आहे. भाजपला पर्यायाने महायुतीला मिळालेला महाकौल तसेच विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या क्षितीजावर अजित पवार यांचा उदय झाल्यानेच इतरवेळीप्रमाणे असणारी गर्दी आणि नेत्यांचा गोतावळा तुलनेत कमी होता, हेही यानिमित्ताने नमूद करावे लागेल.
- पलटवार करण्याची धमकच नाही..!
अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीचे नेते काल आणि आजही शरद पवार यांना वडीलधाऱ्याप्रमाणे आजही मान देतात. शरद पवार यांच्या टीकेला थेट प्रत्युत्तर देण्याचे धाडस अजित पवार गटातील एकाही नेत्याने कधीही केलेले नाही. पवार यांच्या टीकेला उत्तर देणे म्हणजे अजून राजकीयदृष्ट्या खोलात जाण्यासारखे मानले जाते. राष्ट्रवादीतील हे बंडखोर नेते शरद पवार यांच्या पाठींब्यानेच राजकीय क्षितिजावर चमकले आहेत. त्यामुळे मोठ्या पवारांची टीका सहन करुन त्याचे राजकीय प्रतिध्वनी कमीत कमी उठतील, यासाठीच संबंधितांचा प्रयत्न असतो. पवार यांच्या जिल्हा दौऱ्यात त्यांचे समर्थक आणि विरोधक बारकाईने लक्ष ठेवून असतात. मात्र आताचा त्याचा दौरा राजकीय नसला तरी आता इतका राजकीयदृष्ट्या बेदखल कधीही झाला नव्हता. ही नव्या राजकारणाचा नांदी म्हणायची काय ?








