एसकेई सोसायटीच्या कल्चरल अकॅडमीतर्फे आयोजन
बेळगाव : भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे, असे वारंवार सांगितले जात असले तरी ही संस्कृती टिकविणाऱ्या शेतकऱ्यांकडे मात्र आज सरकारसह प्रत्येकजणच दुर्लक्ष करतो. झटपट पैसा मिळविण्याच्या नादात शेतकरीसुद्धा आपली वाट चुकत आहे. सततच्या हायब्रीड बियाणांमुळे जमिनीचा पोत कमी होत असून ही हाव विनाशाकडेच नेणारी आहे. नेमके याचेच चित्रण हायब्रीड या एकांकिकेद्वारे उमटले. एसकेई सोसायटीच्या कल्चरल अकॅडमीतर्फे रविवारी हायब्रीड आणि वारी या दोन एकांकिका सादर झाल्या. नितीन साबळे लिखित हायब्रीडने शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला.
आज शेतकरी दुर्दैवाने दलाल, व्यापारी, पाऊस यांच्यामुळे हतबल झाला आहे. शेती टिकविता टिकविता तो कर्जबाजारी होत चालला आहे. शेवटी तो आत्महत्येचा पर्याय स्वीकारत आहे. शिवाय शेतकऱ्यांची मुले आज शेती करत नाहीत. कारण शेतकऱ्याला कोणी मुली देत नाही, हे वास्तव आहे. अति उत्पन्नाच्या हव्यासापोटी जमीन नापीक होत आहे. याचा दाखला देताना मातृत्वाला आसुसलेल्या स्त्रीच्या वेदनेची जमिनीशी तुलना करणे यात लेखक व दिग्दर्शकाचे कौशल्य होते. वारी ही एकांकिका अर्थातच पंढरीच्या वारीवर आधारलेली आहे. वारी धार्मिक असली तरी प्रत्यक्ष वारीत चालताना आणि विठ्ठलाच्या दर्शनाला पोहोचेपर्यंत अनेकदा चोरी, लबाडी, फसवणूक असे प्रकार होत असतात. त्यामुळे देव नक्की आहे का? असा प्रश्न विद्यार्थ्याला पडतो. त्याचे मतपरिवर्तन करण्यासाठी शिक्षिका वारीला जाण्याचा बेत आखतात. गैर प्रकारांमुळे त्यांनाही खेद होतो.
परंतु सर्व भेद विसरून आपले खुजेपण दूर होण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, यासाठी वारी आणि मंदिर आवश्यक आहेत. विठ्ठल देवळात नाही तर तो माणसांमध्ये आहे. यासाठी आपल्या अंतरंगात डोकावून पहा, असे शिक्षिका सांगतात आणि नेमक्या त्याचवेळी विठ्ठलाचा मुखवटा घेऊन आलेले विद्यार्थी आपल्याला दर्शन झाल्याचे सांगतात, ही कल्पना उत्तम होती. या दोन्ही एकांकिकांमध्ये श्रेया सव्वाशेरी, आप्पा गावडे, राधिका शिंदे, श्री, गिरीश पाटील व राणी लोहार यांचा सहभाग होता. एकूणच या दोन एकांकिका आजच्या वास्तवावर बोट ठेवून अंतर्मुख करणाऱ्या ठरल्या. अकॅडमीच्या अध्यक्षा बिंबा नाडकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी सोसायटीचे उपाध्यक्ष एस. वाय. प्रभू, सचिव मधुकर सामंत, धनश्री आजगावकर उपस्थित होते.









