वृत्तसंस्था/ रबात (मोरक्को)
फिफाच्या क्लबस्तरीय विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद बलाढ्या रियल माद्रिद फुटबॉल क्लबने पटकावले. रियल माद्रिदने आतापर्यंत पाचवेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात रियल माद्रिद फुटबॉल क्लबने सौदी अरेबियाच्या अल हिलाल क्लबचा 5-3 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या अंतिम सामन्यात रियल माद्रिद संघाने आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर दिला होता. रियल माद्रिद क्लबने क्लबस्तरीय अधिकृत फुटबॉल स्पर्धेत आतापर्यंत 100 चषके मिळवली आहेत.
शनिवारच्या अंतिम सामन्यात 13 व्या मिनिटाला व्हिनिसियसने रियल माद्रिदचे खाते उघडले. स्पेनच्या रियल माद्रिद क्लबने 18 व्या मिनिटाला आपली आघाडी वाढवली. रियल माद्रिद संघातील फेडेने हा दुसरा गोल केला. 26 व्या मिनिटाला सौदी अरेबियाच्या अल हिलालचे खाते मौसा मारेगाने उघडले. मध्यंतरापर्यंत रियल माद्रिद संघाने अल हिलाल संघावर 2-1 अशी आघाडी मिळवली होती. स्पर्धेच्या उत्तरार्धात दोन्ही संघांकडून पाच गोल नोंदवले गेले. 54 व्या मिनिटाला माद्रिदचा तिसरा गोल करीम बेन्झेमाने केला. 58 व्या मिनिटाला फेडेने व्हॅलवेर्दने माद्रिदचा चौथा गोल नोंदवला. 63 व्या मिनिटाला लुसियानो विटोने अल हिलालचा दुसरा गोल केला. 69 व्या मिनिटाला व्हिनिसियसने रियल माद्रिदचा पाचवा आणि शेवटच्या गोल नोंदवला. विटोने 79 व्या मिनिटाला अल हिलालचा तिसरा गोल केला पण अखेरीस रियल माद्रिदने हा सामना 5-3 अशा गोलफरकाने जिंकून क्लबस्तरीय विश्वचषक फुटबॉल स्पर्धा पाचव्यांदा जिंकली. या सामन्यात रियल माद्रिदतर्फे व्हिनिसियस ज्युनिअर आणि फेडे व्हॅलवेर्द यांनी प्रत्येकी दोन गोल केले.









