वृत्तसंस्था/ लंडन
रियल माद्रिद फुटबॉल क्लबने शनिवारी येथे चॅम्पियन्स लिग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविताना बोरुसिया डॉर्टमंडचा अंतिम सामन्यात पराभव केला. या विजयामुळे रियल माद्रिदने पंधराव्यांदा युरोपीयन फुटबॉल चषकावर आपले नाव कोरले.
या सामन्या वेळी रियल माद्रिदचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अंतिम सामन्यात रियल माद्रिदतर्फे डॅनी कार्व्हाजेल आणि व्हिनिसियस ज्युनियर यांनी प्रत्येकी 1 गोल केला. बोरुसिया डॉर्टमंडने सामन्याच्या पूर्वार्धात आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर दिल्याने रियल माद्रिदला आपले खाते उघडता आले नाही. 74 व्या मिनिटाला कार्व्हाजेलने हेडरद्वारे रियल माद्रिदचे खाने उघडले. त्यानंतर 83 व्या मिनिटाला व्हिनिसीयस ज्युनियरने शानदार गोल नोंदवून रियल माद्रिदच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केला.









