वृत्तसंस्था/ मियामी गार्डन्स, अमेरिका
टुर्नामेंट स्टार गोंझालो गार्सियाने क्लब वर्ल्ड कपमधील तिसरा गोल करत रिअल माद्रिदला आघाडी मिळवून दिली आणि त्याच्या जोरावर युवेंटसचा 1-0 असा पराभव करत संघाने क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला. स्टार स्ट्रायकर कायलियन एमबाप्पे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकाराने ग्रस्त असल्याने गार्सिया रिअल माद्रिदच्या चारही सामन्यांत सुरुवातीपासून खेळलेला आहे.
या 21 वर्षीय खेळाडूने 54 व्या मिनिटाला हेडरच्या साहाय्याने दुसऱ्या सत्रात गोल केला. स्पर्धेच्या प्रत्येक सामन्यात गोलच्या बाबतीत त्याचे योगदान राहिले आहे. गार्सियाला 68 व्या मिनिटाला बाहेर काढण्यात आले. कारण एमबाप्पे मैदानात उतरून त्याने क्लब वर्ल्ड कपमध्ये पदार्पण केले. एमबाप्पेला मध्यंतरी आजारामुळे ऊग्णालयात दाखल करावे लागले होते आणि तो रिअल माद्रिदच्या गट टप्प्यातील तीन सामन्यांना मुकला.
दुसऱ्या सत्राच्या सुऊवातीच्या मिनिटांत रिअल माद्रिदने युवेंटसचा गोलरक्षक मिशेल डी ग्रेगोरियोला सलग शानदार बचाव करण्यास भाग पाडल्यानंतर गार्सियाच्या हेडरची नोंद झाली. सदर इटालियन गोलरक्षकाने या सामन्यात अविश्वसनीय कामगिरी करत 10 फटके निष्फळ ठरविले आणि त्यामुळे सामना चुरशीचा झाला.
पहिले सत्र गोलरहित राहून दोन्ही बाजूने पारडे समान प्रमाणात झुकलेले राहिले. स्पर्धेतील पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल न करता रोखण्याची ही पहिलीच वेळ होती. दोन्ही संघांना संधी मिळाल्या होत्या, ज्यामध्ये पहिल्या सात मिनिटांत रँडल कोलो मुआनीचा प्रयत्न बारच्या वरून गेला आणि सत्र संपण्यापूर्वी फेडेरिको व्हॅल्व्हर्डेचा फटका डि ग्रेगोरियोने यशस्वी होऊ दिला नी. पण दुसऱ्या सत्रात रिअल माद्रिदने युवेंटसवर मात केली आणि लक्ष्यावर 11 फटके हाणले. याउलट युवेंटसला केवळ दोन फटके हाणता आले.
एमबाप्पे जेव्हा सामन्यात उतरला तेव्हा हार्ड रॉक स्टेडियमवर उपस्थित 62,149 चाहत्यांनी त्याचा जोरदार जयजयकार केला. अनेकांनी त्याच्यासारखी जर्सी घातली होती. सेमीफायनलमध्ये स्थान मिळविण्यासाठी रिअल माद्रिदचा सामना शनिवारी मेटलाइफ स्टेडियमवर बोऊसिया डॉर्टमंड आणि मोंटेरी यांच्यातील विजेत्याशी होईल.









