सायबर गुन्हेगारांच्या गळाला सुशिक्षितच अधिक : अनेक हॉटेलांना सायबर गुन्हेगारांचा फटका,‘फिशिंग’ रोखण्याचे मोठे आव्हान
बेळगाव : मासे पकडण्यासाठी जसे गळ टाकली जाते, तसे सुशिक्षितांना लुटण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी सुरू केलेले ‘फिशिंग’ रोखण्याचे मोठे आव्हान सायबर क्राईम विभागासमोर उभे ठाकले आहे. या गुन्हेगारांच्या उपद्रवामुळे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, उद्योजक आदींबरोबरच सर्वसामान्य नागरिकही त्रस्त आहेत. आता तर असली आणि नकली यांच्यातील फरकही स्पष्टपणे जाणवू नये, याची काळजी घेत सुशिक्षितांना गंडविण्याचे प्रकार वाढले आहेत. हे प्रकार सायबर क्राईम विभागासाठी डोकेदुखीचे ठरू लागले आहेत. बेळगाव शहर व उपनगरातील अनेक हॉटेलांची वेबसाईट हॅक करून त्यांना ठकविण्यात आले आहे. सध्या तंत्रज्ञानाचा जमाना आहे. नाष्टा व जेवणही ऑनलाईन बुक केले जाते. त्याची रक्कमही तंत्रज्ञानाच्या मदतीनेच अदा करण्याची व्यवस्था आहे. धाकधुकीच्या जीवनशैलीत ही व्यवस्था एकादृष्टीने लाभदायक वाटली तरी याच व्यवस्थेला सुरुंग लावत केवळ हॉटेल चालकच नव्हे तर जेवण मागविण्याऱ्यांनाही गंडविण्याचे प्रकार सुरू आहेत.
एखाद्या हॉटेलची वेबसाईट हॅक केली जाते. एकदा या वेबसाईटवर सायबर गुन्हेगारांनी ताबा मिळविला तर त्यानंतर त्या वेबसाईटवर होणारे सर्व व्यवहार सायबर गुन्हेगारांकडूनच केले जातात. लॉज बुक करण्यासाठी किंवा जेवण मागविण्यासाठी ऑनलाईन अदा केलेले पैसेही गुन्हेगारांच्या खात्यात जमा होतात. अशा परिस्थितीत हॉटेलचालक व ग्राहक दोघांनाही आर्थिक फटका बसतो. सध्या बेळगाव शहर व उपनगरातील अनेक हॉटेलांना सायबर गुन्हेगारांचा फटका बसला आहे. मदतीसाठी त्यांनी सीईएन विभागाकडे धाव घेतली आहे. सायबर सुरक्षेची खबरदारी घेऊनही हॅकिंगचे प्रकार सुरूच आहेत. वेबसाईटच नव्हे तर फेसबुक पेजही हॅक केले जात आहे. एखाद्या गेमच्या माध्यमातून वेबसाईट किंवा फेसबुक पेजमध्ये शिरून सायबर गुन्हेगार याचा ताबा घेत आहेत.
लोन अॅपच्या माध्यमातून… सायबर क्राईम विभागाकडे येणाऱ्या तक्रारीमध्ये लोन अॅपच्या माध्यमातून फशी पडलेल्यांची संख्या अधिक आहे. सुरुवातीला झटपट कर्ज देण्याचे सांगून सावजाला सायबर गुन्हेगार आपल्या जाळ्यात अडकवतात. पाच ते 10 हजार रुपयांचे कर्ज देऊन या कर्जाच्या वसुलीसाठी दादागिरी सुरू होते. कर्ज देण्याच्या निमित्ताने सावजाचे मोबाईल हॅक केलेले असते. दिलेल्या कर्जापेक्षा दामदुप्पट वसुली सुरू होते. याला विरोध करणाऱ्यांना बदनाम करण्यात येते. यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. कर्जदाराच्या मित्रांशी संपर्क साधून बदनामी केली जाते. कोणतीही माहिती न देताच कर्जदाराच्या बँक खात्यावरही सायबर गुन्हेगार सहजपणे ताबा मिळवितात. ‘फिशिंग’साठी जाम तारा कुप्रसिद्ध आहे. आता राजस्थान, गुजरात, नोयडा, ग्रेटर दिल्ली, बिहारमध्ये बसूनही गुन्हेगार असे कृत्य करू लागले आहेत. पोलीस अधिकारी आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी गुन्हेगार पुरेपूर खबरदारी घेतात. त्यांनी बँक खाती उघडण्यासाठी दिलेला पत्ता, आधारकार्ड व इतर तपशील खोटे असते. तिथपर्यंत पोहोचूनही गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे पोलिसांना शक्य होत नाही.
वर्क फ्रॉम होम…
घरबसल्या दरमहा 50 हजार ते 1 लाख रुपये कमवा, अशी सोशल मीडियावर जाहिरातबाजी करून सावजाला फसविण्याचे प्रकार वाढले आहेत. मोठ्या कमाईच्या आशेने सावज सहजपणे गुन्हेगारांच्या गळाला लागत आहेत. आता आपल्याला घरात बसून लाख रुपये मिळणार या आशेने संपर्क साधणाऱ्या सावजाला एक टास्क दिली जाते. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते, अभिनेत्रींना सोशल मीडियावर फॉलोव करण्यास सांगितले जाते. त्यावरून त्यांना पॉईंट्स दिले जातात. पहिल्या टास्कला 500 रुपये, दुसरे टास्क पूर्ण केल्यानंतर 1000 रुपये जमा करण्याचे आमिष दाखविले जाते. सावजाची 5000 रुपयांपर्यंत कमाई झाली की ती रक्कम मिळविण्यासाठी निम्मी रक्कम भरण्याचा तगादा लावला जातो.
एका पाठोपाठ एक असे टास्क सुरू होतात. मोठी रक्कम मिळणार या आशेने सावज सायबर गुन्हेगारांच्या बँक खात्यात पैसे जमा करतच असतो. आता तर सर्वोच्च न्यायालयाची अधिकृत वेबसाईटसारखीच बनावट वेबसाईट तयार करण्यात आली आहे. अनेक सरकारी विभागांची बनावट वेबसाईटही कार्यरत आहेत. यांच्या माध्यमातून सावजांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. वेगवेगळ्या कंपन्या, संस्था, बँकांच्या वेबसाईटही साधर्म्य असेल अशी बनावट वेबसाईट सुरू करून ठकविण्यात येते. कमी किमतीत वस्तू देण्याच्या नावानेही बनावट वेबसाईट सुरू करून त्या वस्तू मागविणाऱ्यांची फसवणूक केली जात आहे. एखाद्या वस्तूच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू देण्याचे सांगून ठकविण्याचे प्रकार सुरू आहेत. असे प्रकार रोखण्याचे आव्हान सायबर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
अनावश्यक मॅसेजवरील लिंक ठरू शकते घातक
शहर सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे यांनी फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही बँक केवायसीचा तपशील किंवा ओटीपी मागत नाहीत. यामुळे आपली फसवणूक होईल असा तपशील शेअर करू नये. अधिकाधिक फसवणूक अनावश्यक मॅसेजच्या माध्यमातून होते. आपल्या मोबाईलवर पैशांचे आमिष दाखवत मॅसेज पाठविले जातात. पैसे मिळविण्यासाठी लिंक क्लिक करा, अशी सूचना केली जाते. लिंक क्लिक केली की फसवणूक ही ठरलेलीच. त्यामुळे आपल्याशी संबंधित नसलेले व आमिष दाखविणारे मॅसेजवरील लिंक क्लिक करू नयेत, असे आवाहन करतानाच फसवणूक झाल्यानंतर लगेच 1930 या साहाय्यवाणीशी संपर्क साधून माहिती द्यावी. लवकरात लवकर माहिती मिळाली तर सायबर गुन्हेगारांनी हडप केलेली रक्कम परत मिळविता येते. गेल्या आठ महिन्यांत फसवणूक प्रकरणात पावणेदोन कोटी रुपये गोठविण्यात आले आहेत. ही रक्कम संबंधितांना पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.









