आजपासून सुधारित दर लागू
प्रतिनिधी/ बेंगळूर
दूध, वीज, पाणी, मेट्रो रेल्वे तिकीट दरासह विविध प्रकारच्या दरवाढीनंतर कर्नाटक सरकारने आता मालमत्तांच्या नोंदणी शुल्कात वाढ केली आहे. भूखंड, फ्लॅट, घरांसह स्थावर मालमत्तांच्या नोंदणीचे शुल्क 1 टक्क्यावरून 2 टक्के करण्यात आले आहे. 31 ऑगस्टपासून लागू होईल, याप्रमाणे अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.
राज्यात स्थावर मालमत्ता नोंदणीसाठी 1 टक्का आणि मुद्रांक शुल्क 5.6 टक्के असे एकूण 6.6 टक्के शुल्क होते. मात्र, आता नोंदणी शुल्कात 1 टक्का वाढ करण्यात आल्याने 7.6 टक्के नोंदणी-मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. 2024-25 आणि 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत नोंदणी आणि मुद्रांक खात्याच्या महसुली उद्दिष्टांमध्ये मोठी घट दिसून आली होती. त्यामुळे नेंदणी-मुद्रांक शुल्कातून उत्पन्ना वाढावे, यासाठी सरकारने मिळकतींच्या नोंदणी शुल्कात वाढ केली आहे.
यासंदर्भात खात्याचे आयुक्त मुलै मुगिलन यांनी जारी केलेल्या पत्रकात शेजारील राज्यांच्या तुलनेत कर्नाटकात आकारण्यात येणारे नोंदणी व मुद्रांक शुल्क कमी असल्याचे म्हटले आहे. कर्नाटकात याआधी मुद्रांक, नोंदणी व इतर करांसह 6.6 टक्के शुल्क आकारले जात होते. याच काळात तामिळनाडूमध्ये हा कर 9 टक्के, केरळमध्ये 10 टक्के, आंध्रप्रदेशात 7.5 टक्के आणि तेलंगणामध्ये 7.5 टक्के आहे. प्रशासकीय प्रक्रिया बळकट करणे आणि नागरिकांना उत्तम व अधिक कार्यक्षम सेवा प्रदान करण्यासाठी 31 ऑगस्टपासून नोंदणी शुल्क 1 टक्क्यावरून 2 टक्के करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी यापूर्वी सादर केलेल्या आणि छाननीच्या प्रक्रियेत असलेल्या दस्तऐवजांच्या नोंदणी शुल्काची पुनर्गनणा केली जाईल तसेच 2 टक्के सुधारित नोंदणी शुल्क भरावे लागेल. सुधारित नेंदणी शुल्काची माहिती देयक प्रक्रिया पूर्ण होण्याआधी अर्जदारांना कळविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी टप्प्याटप्प्याने अनुसरण्याच्या तपशिलवार सूचना खात्याच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्दा करण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.









