काटामारी रोखण्यासाठी शेतकऱ्यांनीच पुढे येण्याची गरज; वजनाबाबत ऊस उत्पादकांनी जागरुक राहणे आवश्यक; काटमारीतील उसातून कारखानदारांचे मोठे अर्थकारण
कृष्णात चौगले कोल्हापूर
गतवर्षी बांबवडेतील साखर कारखान्याकडून ऊस वजनात होत असलेली काटामारी एका शेतकऱ्यानेच उघडकीस आणली. त्यामुळे कारखानदारांचे काटामारीतील अर्थकारण किती मोठे आहे ? हे स्पष्ट झाले. केवळ एक साखर कारखान्यातील काटामारी उघडकीस आली म्हणजे इतर कारखान्यांचा कारभार पुर्णपणे पारदर्शी आहे, असे म्हणता येणार नाही. ऊस तोडीदरम्यान उत्पादकांनी आपले नुकसान टाळण्यासाठी स्वतःच पुढे येऊन खासगी वजनकाट्य़ावर वजन करून वाहन कारखान्याकडे पाठवणे आवश्यक आहे. तेंव्हाच ऊस चोरीला काहीअंशी आळा बसणार आहे.

खते, बि-बियाणे, मजुरी, औषधांसह मशागत खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे उसाचा उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसवताना शेतकरी मेटाकुटीस आला आहे. महापूर, अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे वर्षानुवर्षे ऊस पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. अशा परिस्थितीत साखर कारखान्याकडे जाणाऱया ऊसाचे वजन तंतोतंत बरोबर येईल काय ? याबाबत शेतकऱ्यांसह ऊस तोड मजूर आणि वाहन चालकांनाही खात्री देता येत नसल्याचे चित्र आहे. ऊस तोड मजुरांना ऊसाचे वाहन भरल्यानंतर त्याचे साधारणपणे वजन किती येईल, याचा अचूक अंदाज असतो. पण त्यांचा हा अंदाज दीड ते दोन टनांनी चुकत असल्याचे चित्र आहे. याबाबत शेतकऱ्याला माहिती सांगून ऊसाचे वजन करून वाहन कारखान्याकडे पाठवल्यास कारखानदारांकडून वाहतूकदारास आणि संबंधित ऊस तोड मजूरांना टार्गेट केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. वजनकाट्य़ातील घोळ उघडकीस आणल्यास पुढील हंगामात ऊस तोडीचे कंत्राट मिळेल की नाही ? याबाबत त्यांच्या मनात भिती असते. सर्व अंतर्गत घडमोडी माहिती असतानाही त्याकडे ते जाणिवपूर्वक दूर्लक्ष करतात. त्यामुळेच काटामारीचे दुष्टचक्र अखंडीत सुरु आहे.
एक खेपेमागे सुमारे एक ते दीड टनाची लूट
गतवर्षी बांबवडेतील साखर कारखान्याची काटामारी उघडीस आल्यानंतर जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी गाळप झालेल्या उसाची माहिती घेतली. त्या दरम्यान कारखान्याने 1 लाख 4 हजार 97 टन उसाचे गाळप केले होते. यामध्ये कारखान्याच्या वजनकाटय़ातून सोळा ते वीस टनापर्यंतच्या खेपेमागे एक टन ते तेराशे किलोचा असल्याचे स्पष्ट झाले. हा ऊस कारखाना व्यवस्थापनाच्या विश्वासातील नोकर किंवा नातेवाईकांच्या नावे नोंद करून त्यांना बोगसरीत्या ऊस उत्पादक शेतकरी दाखवले गेल्याचा माने यांचा दावा आहे. काटमारी करणाऱ्या इतर साखर कारखान्यांकडूनही हाच फॉर्म्युला अवलंबला जात असावा असेही माने यांनी स्पष्ट केले. दरम्यान वजनात फरक आढळल्यानंतर कारखाना व्यवस्थापनाने अवघ्या काही मिनिटांत सदरचा वजनकाटा पूर्वपदावर म्हणजेच अचूक स्थितीत आणला. त्यामुळे साखर कारखान्यांनाकडून किती झटपट पद्धतीने शेतकऱ्यांना लुटले जाते याचा अंदाज आला आहे.
वैधमापनशास्त्र विभाग आणि कारखानदारांमध्ये मिलीभगत
वैधमापनशास्त्र विभागाकडून दरवर्षी कारखान्यांतील वजनकाटय़ाची पडताळणी केली जाते. तसेच साखर कारखाने सुरु झाल्यानंतर काही तक्रारी झाल्यास तपासणीही केली जाते. पण राज्यात आजपर्यंत वैधमापनच्या अधिकाऱ्यांना (शेतकऱयांनी उघडकीस आणल्याशिवाय) एकही साखर कारखान्याच्या काटय़ामध्ये फरक आढळलेला नाही. सर्व काटे बरोबर असल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडून दिले जाते. तसेच त्यांनी काटामारी उघडकीस आणण्याचा प्रयत्न केल्यास कारखानदारांकडून राजकीय दबाव आणला जातो. मुळातच इलेक्ट्रिक वजनकाटा बसवताना त्यामध्ये फेरफार करण्यासाठी वाव असतो. काटा बसवणाऱ्या कंपन्यांनाच त्याबाबत सूचना दिलेल्या असतात. वजनकाटा कंपनीच्या अधिकाऱयांशी संधान साधून सॉफ्टवेअरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने फेरबदल करून शेतकऱ्यांना लुटले जाते. पण कारखानदार आणि वैधमापनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत असल्यामुळे शेतकऱ्यांची लुटमार वर्षानुवर्षे सुरुच असल्याचा आरोप शिवाजीराव माने यांनी केला आहे.
प्रत्येक कारखान्याबाहेर वजनकाटे उभारण्याची गरज
काटामारी रोखण्यासाठी वजनकाटे ऑनलाईन करून त्याचा पासवर्ड साखर आयुक्तांकडे ठेवण्याबरोबरच प्रत्येक कारखान्याबाहेर वजनकाटा उभारण्याची गरज आहे. त्यामुळे ऊस तोड झाल्यानंतर शेतकरी आपल्या ऊसाचे वजन परिसरातील खासगी वजनकाटय़ावर करून पुन्हा कारखान्याबाहेरील काटय़ावर वजनाची पडताळणी करू शकतो. सध्या सर्व कारखान्याच्या आतील भागात वजनकाटे असल्यामुळे वाहन तळावर 10 ते 15 तासांच्या प्रतिक्षेनंतर उसाचे वजन केले जाते. पण कारखान्यामध्ये आत जाण्याच्या वाटेवरच वजनकाटे उभारल्यास शेतकऱ्यास उसाच्या वाहनासोबत येऊन वजन पाहणे शक्य होईल.
शिवाजीराव माने, अध्यक्ष जय शिवराय किसान संघटना









