भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचे मत
प्रतिनिधी / पणजी
माझे राज्यसभेवर जाणे किंवा नाही हे सर्वस्वी पक्षाच्या इच्छेवर अवलंबून आहे. सध्यातरी त्यासंबंधी कुणीही अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. तरीही पक्षाने संधी दिल्यास त्याचा स्वीकार करण्याची तयारी असेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केले.
पणजीत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. मी राज्यसभेवर जावे असे पक्षाला वाटत असेल तर मी जाईन. माझ्या कार्यकर्त्यांनाही मी राज्यसभेवर जावे असे वाटू शकते. पण, ते पक्षाकडून यायला हवे, असे ते म्हणाले.
विद्यमान खासदार विनय तेंडुलकर यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ 28 जुलै रोजी संपत आहे. 31 जुलै 2017 रोजी ते राज्यसभेवर निवडून आले होते. राज्यात भाजपचे सर्वाधिक आमदार असल्यामुळे राज्यसभा निवडणुकीत भाजपचाच उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. 23 जुलै रोजी राज्यसभा निवडणूक होणार आहे.
दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबद्दल विचारले असता, तानावडे यांनी उत्तरेसह दक्षिण गोव्यातील जागाही भाजपच जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. दक्षिण गोव्याची जागा किमान 30 हजार मतांच्या फरकाने जिंकेल असा अंदाज त्यांनी वर्तवला.
या निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली असून विविध कार्यक्रम, अभियान आदींच्या माध्यमातून लोकांशी संपर्क वाढविण्यास प्रारंभ केला आहे. या तयारीचाच भाग म्हणून दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोंडा येथे जाहीर सभेसही उपस्थिती लावली होती. त्यावेळी निवडणुकीची घोषणा करताना त्यांनी दोन्ही जागा भाजपच जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला होता.









