भारतीय नौदलाकडून संकेत : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिन्ही संरक्षणदलांच्या हालचालींना वेग
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आपण कोणत्याही क्षणी आक्रमणासाठी सज्ज आहोत, असा स्पष्ट संकेत भारतीय नौदलाने दिला आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाने आपली सज्जता ठेवली असून आम्हाला आदेशाची प्रतीक्षा आहे, असे दर्शवून दिले आहे. केवळ नौदलच नव्हे, तर भारताच्या संरक्षण विभागाच्या तिन्ही दलांनी जोरदार युद्धाभ्यासास प्रारंभ केला असून कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही आव्हानाशी यशस्वीरित्या दोन हात करण्याची पूर्ण सज्जता असल्याचा संदेश दिला आहे.
नौसेनेकडून एक संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आला आहे. या संदेशात नौसेना आक्रमणसज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आम्हाला जो आदेश देण्यात येईल, त्याचे परिपूर्ण पालन करण्यासाठी आमची सज्जता पूर्ण झाली आहे. ज्यावेळी आम्हाला जी कृती करण्याचा आदेश देण्यात येईल, त्यावेळी त्याप्रमाणे केले जाईल. आम्ही युद्धसज्ज आहोत, असे नौदलाने स्पष्ट केले आहे.
तिन्ही दलांचा युद्धाभ्यास
नौदलाप्रमाणेच भूदल आणि वायूदलही जोरदार युद्धाभ्यास करीत आहे. सीमावर्ती भागांमध्ये वायूदलाच्या युद्धकसरती पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवसापासून होत आहेत. या सरावामध्ये राफेल आणि सुखोई या अत्याधुनिक विमानांचा मुख्यत्वेकरुन समावेश आहे. तिन्ही दलांचे हेलिकॉप्टर विभागही कार्यरत झाले आहेत. भारतीय नौदलाने आपल्या आक्रमण नौका, विनाशिका, पाणबुड्या आणि विमानवाहू नौका यांना सज्जतेचा आदेश दिला असून नौकांचा सराव होत आहे.
सीमेवर तुकड्या नियुक्त
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा यांच्यावर भारताने अधिक प्रमाणात सैनिक तुकड्या नियुक्त केल्या आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही स्थानी, कोणत्याही वेळी कोणत्याही आदेशाचे परिपूर्ण पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तिन्ही दलांच्या एकत्रित कमांडच्या बैठकाही होत असून युद्ध उद्भवलेच, तर तिन्ही दलांमध्ये योग्य प्रकारचा समन्वय राखण्यासाठीही पूर्ण सज्जता केली जात आहे.
अधिकाऱ्यांच्या बैठका
देशाच्या संरक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी सातत्याने तिन्ही सेनादलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठका करीत आहेत. कोणती कृती, केव्हा, कोठे आणि कोणत्या प्रमाणात केल्यास काय परिणाम होतील, यासंबंधी चर्चा केली जात आहे. सरकारचे धोरण आणि तिन्ही संरक्षण दलांची सज्जता यांचा ताळमेळ घातला जात आहे.
इतर देशांना पुरावे सादर
भारताचा परराष्ट्र व्यवहार विभागही कार्यरत आहे. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका महत्त्वाची आहे. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृतच आहे, याचे अनेक पुरावे भारताने अन्य महत्त्वाच्या देशांना सादर केले आहेत. 75 देशांनी आतापर्यंत भारताला समर्थन व्यक्त केले असून काही देशांनी भारताच्या संभाव्य कारवाईलाही समर्थन घोषित केले आहे. त्यामुळे भारताचा हुरुप वाढला आहे.
काश्मीरमध्ये बुलडोझर कारवाई
भारतीय सेना, सीमा सुरक्षा दल आणि काश्मीरमधील पोलीस विभाग यांनी काश्मीर खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात धाडसत्राला प्रारंभ गेला आहे. पहलगाम हल्ल्याशी संबंधित 75 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. सीमावर्ती वनक्षेत्रात सेनेच्या तुकड्या रात्रंदिवस लक्ष ठेवत असून संशयास्पद मानवी हालचाली टिपण्यासाठी हेलिकॉप्टर्सचा उपयोग केला जात आहे. वनविभागांमधील दहशतवाद्यांची स्थाने उद्ध्वस्त करण्यासाठी ही कारवाई केली जात आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर प्रशासनाने दिली.
अनेक संशयितांची पाडली घरे
शुक्रवार आणि शनिवारी काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्याला साहाय्य करण्याचा संशय असणाऱ्या स्थानिक दहशतवाद्यांची घरे बुलडोझर लावून नष्ट करण्यात आली आहेत. तसेच काही संशयितांची घरे बाँबने उडविण्यात आली आहेत. दहशतवाद्यांना धाक बसण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पहलगाम, अनंतनाग आणि बांदीपोरा येथे एकंदर 17 घरे अशाप्रकारे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. शोपियान येथेही प्रशासनाने बुलडोझर कारवाईला प्रारंभ केला आहे.
खोऱ्यात पुन्हा पर्यटकांचे आगमन
पहलगाम हल्ला झाल्यापासून तीन दिवसांच्या नंतर काश्मीर खोऱ्यात पुन्हा पर्यटकांची वर्दळ पहावयास मिळत आहे. ही संख्या हल्ल्यापूर्वीच्या संख्येपेक्षा कमी असली, तरी ती आश्वासक असून आम्ही दहशतवाद्यांना भीक घालत नाही, हा संदेश पर्यटकांनी दिला आहे. काश्मीर खोऱ्यातील स्थानिक जनतेसाठीही ही समाधानाची बाब असून दहशतवादाशी दोन हात करताना आम्ही तुमच्यासह आहोत, असा संदेश जणू हे पर्यटक देत आहे, अशी स्थानिकांची प्रतिक्रिया आहे.
भारताची युद्धसज्जता…
ड तिन्ही संरक्षण दलांना सदैव सज्ज राहण्याचे आदेश, जोरदार युद्धसराव
ड काश्मीरमध्ये धाडसत्र, दहशतवादाची पाळेमुळे उखणण्यासाठी अभियान
ड विश्व समुदाय भारताच्या बाजूने, पाकिस्तान एकाकी पडण्याची चिन्हे
ड काश्मीरमध्ये हल्ल्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा पर्यटक आल्याने उत्साह









