चिपळूण :
लाडक्या बाप्पाचे आगमन काही तासांवर आल्याने गणेशोत्सवाच्या सजावट साहित्याने चिपळूण शहर बाजारपेठ पूर्णतः गजबजून गेली आहे. खरेदीला आतापासून गर्दी झाली. सजावट साहित्यामध्ये कापडी फुलांसह तयार मखर, एलईडी लाइट्स, प्रसाद यांची क्रेझ कायम आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनी या सजावट साहित्यांची दुकानाबाहेर आकर्षक स्वरुपात मांडणी केली आहे.
कोकणात इतर सणांपेक्षा गणेशोत्सवाला विशेष महत्व आहे. गणेशभक्तांची आतापासून लगबग आणि नियोजन सुरू झाले आहे. गणेशोत्सवादरम्यान बाप्पाच्या सजावटीला विशेष महत्व दिले जात असल्याने संपूर्ण बाजारपेठ सजावट साहित्याने गजबजून गेली आहे. बहुतांशी व्यावसायिकांनी आपल्या दुकानात सजावट साहित्याची आकर्षक मांडणी करून ठेवली होती. असे असताना सद्यस्थितीत संपूर्ण बाजारपेठ मखर, सिंहासन, तयार पाना-फुलांच्या माळा, रोषणाईसाठीच्या विद्युत माळा यांच्या स्टॉल्समुळे चैतन्यमय बनली आहे. विशेष म्हणजे थर्माकोलवर बंदी असल्याने यंदा कापडी व प्लायवूडचे मखर विक्रीसाठी दाखल झाले असून गणेशभक्तानी त्यास अधिक पसंती दिली आहे..

- कापडी हार-फुलांची क्रेझ कायम
बाप्पाच्या स्वागतासाठी सजावटीला विशेष महत्व असल्याने कापडी फुलांची माळ, हार, झुंबराला मागणी वाढली आहे. याच सजावट साहित्याची क्रेझ कायम असल्याने बाजारपेठेतील प्रत्येक दुकानात फुलांची माळ, हार दिसू लागले आहेत. रंगीत फुले, माळा शिवाय भुरळ घारणाऱ्या आकर्षक डिझाईन यामुळे खरेदीदरम्यान ग्राहकही पसंती करताना संभ्रमात पडत असल्याचे चित्र आहे. या फुलाची माळ, हार, तोरण अगदी १०० रुपयांपासून ते ३ ते ५ हजारापर्यंत विकल्या जात आहेत.
- फुलांचे व प्लायवूडचे मखर
शहर बाजारपेठेतील सजावट साहित्याच्या दुकानात व्यावसायिकांनी फुलांचे तसेच काही ठिकाणी प्लायवुडचे मखर विक्रीसाठी ठेवले आहेत. लक्षवेधी ठरणाऱ्या मखरांच्या किमती सामान्य गणेशभक्ताच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यावर पर्याय म्हणून अनेकांनी स्वतः हाती मखर तयार करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. असे असले तरी फुलांच्या मखरांची क्रेझ कायम असून त्यास अनेकजण पसंती दर्शवत आहेत. सध्या हे मखर अगदी १ हजार रुपयांपासून ५ हजार ते ८ हजारापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे. याबरोबर कंठीमध्ये जवळपास ५० हून अधिक प्रकार असून त्या आकारानुसार मिळत आहेत. रांगोळी, आकर्षक एलईडी लाईटस शिवाय धूप, अगरबत्तीचे नवनवीन प्रकार उपलब्ध झाले आहेत.

- प्रसादाचेही स्टॉल
यापूर्वी गणेशोत्सवासाठी लागणारा प्रसाद हा घरातच बनवण्याची परंपरा होती. मात्र गणेशभक्ताच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही पद्धत हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे. शिवाय प्रसादासाठी दरवर्षी फुटाण्याचेच वाटप केले जात असल्याने बाजारपेठेत बहुतांशी दुकानात फुटाण्यांची विक्री होत आहे. इतकेच नव्हे तर काही व्यावसायिकांनी तयार बुंदीचा मोदक तसेच ड्रायफ्रूट प्रसाद आदींचे स्टॉलही सर्वत्र मांडले आहेत. या प्रसादाची अगदी १० रुपयांपासून विक्री केली जात आहे.








