भुयारासह 22 किमी लांबीचा मार्ग तयार करण्याची योजना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमरनाथची यात्रा करू पाहणाऱया भाविकांना केंद्र सरकार लवकरच मोठी सुविधा उपलब्ध करणार आहे. केंद्र सरकारने चंदनवाडी आणि संगमादरम्यान 22 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावरुल 11 किलोमीटरच्या हिस्स्यावर भुयारी मार्ग तयार केला जाणार असून तो गणेश टॉप अंतर्गत असणार आहे. नवा रस्ता श्रीनगर शहरात न जाता लडाख आणि जम्मूदरम्यान एक पर्यायी मार्ग देखील प्रदान करणार आहे. हा 22 किलोमीटरचा मार्ग सर्व ऋतूंमध्ये भाविकांसाठी अनुकूल असणार आहे.
केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने या नव्या मार्गाच्या निर्मितीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग अवसंरचना विकास निगम लिमिटेडला (एनएचआयडीसीएल) सोपविली आहे. एनएचआयडीसीएलकडे एनएच-501 च्या खानाबल-बालटार सेक्शनवर ‘शेषनाग भुयारा’ची निर्मिती जबाबदारी आहे. केंद्राचे हे महामंडळ या प्रकल्पासाठी निविदा मागविणार आहे. याकरता 13 फेब्रुवारीपासून प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रकल्पाचे काम इंजिनियरिंग, प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन (ईपीसी) मोडमध्ये केले जाणार आहे. या प्रकल्पाचा पूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार असून खासगी क्षेत्रातील भागीदार इंजिनियरिंग आणि निर्मितीकरता आवश्यक सहाय्य करणार आहे.

प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंपन्यांना विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 10 महिन्यांची मुदत दिली जाणार आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीत 5 वर्षांचा कालावधी लागणार आहे. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्हय़ात समुद्रसपाटीपासून 13 हजार फुटांच्या उंचीवर अमरनाथ मंदिर आहे. अमरनाथ गुहा मंदिराचे दर्शन करण्यासाठी भाविक केवळ पायीच पोहोचू शकतात. लिड्डर खोऱयाच्या अखेरीस एका चिंचोळय़ा दरीत हिमालयातील अमरनाथ गुहा मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना मोठय़ा समस्यांना सामोरे जावे लागते. मंदिरापर्यंत पोहोचविणारा मार्ग अत्यंत अवघड आहे. यामुळे अमरनाथ यात्रा मार्ग जुलै-ऑगस्टच्या आसपासच जनतेसाठी खुला केला जातो.
पहलगामपासून सुमारे 40-45 किलोमीटर आणि बालटालपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदिराचा बालटाल मार्ग कमी अंतराचा आहे, परंतु उभा चढाव असल्याने लोकांना या मार्गावर मोठी समस्या होते. तर पहलगाम मार्ग लांब अंतराचा असला तरीही भाविकांसाठी मंदिरापर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग आहे. बालटाल मार्गाला एक दिवसात पूर्ण केले जाऊ शकते. परंतु पहलगाम मार्गासाठी किमान 4 दिवसांची आवश्यकता असते. या मार्गात भाविक चंदनवाडी, शेषनाग आणि पंचतरणीमध्ये रात्री वास्तव्य करू शकतात.
अमरनाथ यात्रेदरम्यान अनेक भाविकांचा मृत्यू होत असतो. मागील वर्षी अमरनाथ येथे अचानक आलेल्या पूरामुळे 15 भाविकांना जीव गमवावा लागला होता. तर अन्य नैसर्गिक कारणांमुळे देखील 42 भाविकांचा मृत्यू झाला होता. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2016-19 दरम्यान अमरनाथ यात्रेदरम्यान सुमारे 107 जणांचा मृत्यू झाला आहे. रस्तेनिर्मिती प्रकल्पाचा उद्देश भाविकांना सर्वऋतू म्हणजेच वर्षभर कनेक्टिव्हीटी प्रदान करणे असल्याचे अधिकाऱयाने सांगितले आहे.
या रस्त्याची निर्मिती सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करता येईल अशाप्रकारे केली जाणार आहे. यामुळे भाविकांना अमरनाथपर्यंत जाणे अत्यंत सुलभ ठरणार आहे. हा मार्ग तयार झाल्यावर जम्मूपासून लडाखच्या दिशेने जाणाऱया प्रवाशांना श्रीनगरमध्ये जावे लागणार नाही. हा मार्ग त्यांना पर्यायी कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे.









