युपीएससी टॉपर बिरदेव डोणे यांनी व्यक्त केल्या भावना : तरुण भारतला दिली विशेष मुलाखत : जुन्या टॉपर्सच्या नोट्स ठरल्या फायदेशीर
निपाणी : दहावीत पहिला आल्यावर अधिकारी व्हायचं निश्चित केलं होतं. सात-आठ वर्षांपूर्वी पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना त्याच महाविद्यालयात शिकलेली 17 ते 18 मुले युपीएससी परीक्षेत यशस्वी झाली. त्यांचा सत्कार महाविद्यालयाने केला. तो सत्कार पाहून अभ्यासातून युपीएससीची धडक द्यायची उर्मी चढली. दोनवेळा अपयश आले तरी ध्येय स्वस्थ बसू देत नव्हते. यातूनच पुन्हा परीक्षा दिली. चार दिवसांपूर्वी बकऱ्यांच्या पालात असताना युपीएससी परीक्षा पास झाल्याचा फोन आला आणि आनंदाला पारावार उरला नाही. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना घरच्यांचे खंबीर पाठबळ,शिष्यवृत्ती आणि मित्रांची आर्थिक मदत या जोरावर बकऱ्यांच्या पालातून पुणे गाठलं आणि तिथूनच खऱ्या अर्थाने यशाचा मार्ग मिळाला, अशा भावना यमगे (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील युपीएससी टॉपर बिरदेव डोणे यांनी व्यक्त केल्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात महाराष्ट्रातील 90 तर कोल्हापूर जिह्यातील 4 जणांनी यशाचा डंका वाजवला. यातच यमगे येथील बिरदेव सिद्धाप्पा डोणे यांनी देशात 551 वा क्रमांक मिळवत चार वर्षांच्या प्रयत्नांना यशाचे चारचांद लावले. बिरदेव यांच्या यशाची गाथा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि सारे त्यांना शोधायला लागले. शनिवारी त्यांनी आपल्या बहिणीच्या गावी जोडकुरळी (ता. चिकोडी) येथे तरुण भारतला विशेष मुलाखत दिली. त्याचा हा सारांश…
तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल काय सांगाल?
माझे आई-वडील मेंढपाळ. अर्थातच ते अशिक्षित. घरची एक एकर शेती. मी सहावी-सातवीत असताना आमची 100 बकरी वडिलांनी मामाकडे अकोळ (ता. निपाणी) येथे पाठवली. त्यामुळे आणखीनच आर्थिक चणचण भासू लागली. अशावेळी वडील सेंट्रींग कामास तर आई दुसऱ्याच्या शेतात भांगलायला जाऊ लागली. माझे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावात तर महाविद्यालयीन शिक्षण मुरगूड येथे झाले.
युपीएससीचे ध्येय कधी निश्चित केले?
दहावीत असतानाच अधिकारी होण्याचे स्वप्न होते. सिव्हिल इंजिनिअरिंग पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे झाले. येथे शिकत असताना युपीएससी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात मी हजर होतो. त्यावेळी अधिकारी होण्याची जिद्द आणखी बळावली. तेथून येईल ती परीक्षा देत सुटलो. भावाचे पीएसआय होण्याचे स्वप्न होते मात्र तो सैन्यदलात भरती झाला. भरती झाल्यानंतर त्याने आर्थिक पाठबळ दिल्याने मी पोस्टात मिळालेली सरकारी नोकरी सोडत पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
अभ्यासासाठी कोणत्या नोट्स वापरल्या?
मंगळवेढा येथील मित्र जय पाटील याच्यासोबत दिल्लीत जाऊन युपीएससीचे कोचिंग क्लासेस लावण्याचा निर्णय घेतला. मात्र पैशाची अडचण होतीच. तेव्हा मित्राच्या आजोबांच्या ओळखीचे अजित शहा यांनी कोचिंग क्लासेसची 2 लाख 35 हजार रुपये फी भरली. क्लासेस करत असतानाच युट्यूबच्या माध्यमातून यापूर्वी युपीएससी टॉपर्स ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती आणि त्यांनी वापरलेल्या नोट्स पाहिल्या. त्या घेऊन अभ्यास सुरू केला. एनसीईआरटीच्या नोट्स महत्त्वपूर्ण ठरल्या. दोनवेळा अपयश आले मात्र प्रयत्नांची पाठ सोडली नाही. यातूनच हे यश मिळाले.
मोबाईल हरवल्यानंतर ज्या पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल?
पोलिसांनी काहीच सहकार्य केले नाही, असे नाही. पुण्यात वाचनालयातून बाहेर पडल्यानंतर एकाने मोबाईल हिसकावून घेऊन पळ काढला. तेव्हा जवळच्या पोलीस स्थानकात मोबाईल हरवल्याची तक्रार नोंद करण्यासाठी गेलो असता त्यांनी ऑनलाईन नोंद करण्यास सांगितले. त्यावेळी मित्राचे वडील कोल्हापूरला पोलीस निरीक्षक असल्याने त्यांना विचारले असता मोबाईल चोरीला गेला यापेक्षा मोबाईल हिसकावून नेला हा फौजदारी गुन्हा असून त्याची नोंद होणे आवश्यक असल्याचे सांगत सदर पोलीस स्थानकात संपर्क केला. त्यानंतर तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी सहकार्य केले.
100 टक्के प्रयत्न करा, ‘प्लॅन बी‘देखील ठेवा
युपीएससी असो, एमपीएससी असो किंवा अन्य कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, यशस्वी होण्याच्या जिद्दीने प्रत्येकाने प्रयत्न करावेत. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना 100 टक्के प्रयत्न करावेत, अपयश आले तरी खचून जाऊ नये, आणखी प्रयत्न करावेत, हे करत असताना दुर्दैवाने वय आणि संधीची मर्यादा ओलांडल्यास प्लॅन बी देखील तयार ठेवण्याची मानसिकता बाळगावी. कारण जरी स्पर्धा परीक्षेत अपयश आले तरी आणि अन्य आवडीच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अनुभव म्हणून कामी येऊ शकतो. आदर्श समाज निर्मितीसाठी स्पर्धा परीक्षा मोलाच्या ठरतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला घटनेची मूल्ये, व्यक्तीचे अधिकार, सामाजिक जागरूकता यांची जाणीव होते. आदर्श समाज निर्मितीसाठी हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेमुळे केवळ अधिकारीच घडतात असे नाही तर चांगला माणूस घडवण्याची ताकदही या परीक्षांमध्ये असते, असेही बिरदेव डोणे यांनी प्रांजळपणे सांगितले.









