बळ्ळारी नाल्याचाही होणार विकास : बुडा बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या सोळा वर्षांपासून रेंगाळलेली कणबर्गी स्कीम नंबर 61 निवासी योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी फेरनिविदा काढणे, बळ्ळारी नाल्यामुळे शेतकऱ्यांचे दरवषी होणारे नुकसान टाळण्यासाठी नाल्याचा विकास व इतर महत्त्वाच्या विषयांवर शनिवार दि. 18 रोजी बुडाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
शनिवारी बुडा कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे होते. गेल्या सोळा वर्षांपासून कणबर्गी येथील स्कीम नंबर 61 ही निवासी योजना रेंगाळली आहे. त्यामुळे तातडीने योजना पूर्ण करून जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना भूखंड देण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. मात्र, अद्यापही भूखंडांचा विकास करण्यात आलेला नाही. ही स्कीम पूर्ण झाल्यानंतर जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना 50 टक्के भूखंड दिले जाणार आहेत. तर उर्वरित भूखंडांची विक्री बुडाकडून केली जाणार आहे. जमीन देऊन सोळा वर्षे उलटली तरीही भूखंड मिळाले नसल्याने शेतकऱ्यांकडून सातत्याने बुडा कार्यालयासमोर आंदोलन केले जात आहे. त्यामुळे शनिवारच्या बैठकीत कणबर्गी स्कीम नंबर 61 यावषी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी फेरनिविदा मागविण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर बळ्ळारी नाल्यामुळे दरवषी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नाल्याच्या विकासासाठी पावले उचलण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच रामतीर्थनगर येथे बुडाकडून मंगल कार्यालय उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकर पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली. तसेच बुडाच्या हद्दीत येणारी उद्याने आणि रस्त्यांचाही विकास करण्यावर चर्चा झाली.
यावेळी आमदार राजू सेठ, बुडा आयुक्त शकिल अहमद, सरकार नियुक्त सदस्य राघवेंद्र भोई, पुष्पा पर्वतराव, मनपा अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
निवासी योजनेसाठी सांबरा, नानावाडी रोडवर जागांचा शोध
सध्या बुडाकडून नवीन रहिवासी योजना राबवण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू आहे. त्यामुळे सांबरा रोडवर 300 एकर, नानावाडी रोडवर 50 एकर जागा संपादित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली असून शेतकऱ्यांनी निवासी योजनेसाठी जमीन दिल्यास या दोन्ही ठिकाणी निवासी योजना राबवली जाणार आहे.









