डिचोली खाण जनसुनावणीत ग्रामस्थांची मागणी : तब्बल 190 लोकांनी मांडले विरोधी-समर्थनाचे मुद्दे
डिचोली : डिचोली तालुक्यातील शिरगाव ते पिळगाव या खाणपट्ट्याच्या ब्लॉक 1 या लीजमधील खाण प्रक्रियेसाठी वाठादेव सर्वण येथील नारायण झांट्यो क्रीडा संकुलात काल शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या जनसुनावणीत शेकडो लोकांनी आपापले मुद्दे मांडले. या सर्वांमध्ये विविध मतांतरे पहायला मिळाली. खाण व्यवसायाला विरोध दर्शविणाऱ्या वक्त्यांनी खाणींमुळे आतापर्यंत काय यातना लोकांनी आणि पर्यावरणाने भोगलेल्या आहेत याचे विश्लेषण मांडले. खाणींना समर्थन देणाऱ्यांनी खाण व्यवसाय का आवश्यक आहे, याचे विश्लेषण सादर केले. खाण लीज भागांचे पुन्हा सर्वेक्षण व्हावे आणि त्यानंतरच नव्याने जनसुनावणी घेण्यात यावी, असा जोरदार सूर अनेक पर्यावरण अभ्यासकांनी तसेच ग्रामस्थांनी लावून धरला. या जनसुनावणीसाठी गेल्या सुमारे महिनाभरापासून कंपनी व्यवस्थापन, कंपनीत कामावर रूजू झालेल्या कामगारांनी कंबर कसली होती. सर्व सामाजिक संस्था, राजकारणी, स्वयंसेवक, देवस्थान समित्या, कोमुनिदाद, व्यापारी संघटना यांना भेटून या जनसुनावणीत खाण व्यवसायाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. सध्या कामावरून कपात करण्यात आलेल्या कामगारांनी खाणीच्या विरोधात आपल्या परीने प्रचार सुरू ठेवला होता. त्यामुळे ही जनसुनावणी बरीच गाजणार आणि लक्षवेधी ठरणार अशीच अपेक्षा होती. अपेक्षेप्रमाणे या जनसुनावणीसाठी सकाळीपासूनच लोकांनी बरीच गर्दी केली होती. सकाळी 9.30 ते दु.12 या वेळेत जनसुनावणीत भाग घेणाऱ्यांना नाव नोंदणीची संधी देण्यात आली होती. या वेळेत सुमारे 190 जणांनी रांगेत उभे राहून आपल्या नावांची नोंदी केली. प्रत्यक्षात 10.30 वा. या जनसुनावणीला प्रारंभ झाला. यावेळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी डॉ. मोसन गिरप, डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांची उपस्थिती होती. प्रारंभी कंपनीकडून या खाण प्रकल्पाचे क्रिनवर सादरीकरण करण्यात आले. सभागृहात मोठ्या संख्येने दोन्ही गटातील कामगार, समाजसेवी कार्यकर्ते, पर्यावरणवादी, विविध पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वसमावेशक खाण व्यवसाय हवा आम्हाला खाण नक्षलवादी तयार करायचे नाहीत, सर्वसमावेशक खाणी हव्यात.
गेल्या कनेक वर्षांनंतर प्रथमच या लोकांसमोर आपल्याला कशा खाणी पाहिजे हे मांडण्यासाठी संधी आली आहे. या संधीचा लाभ उठवत आमच्या भविष्यातील पिढीला कोणत्याही प्रकारचा त्रास व यातना होणार नाही, या प्रकारचा खाण व्यवसाय आम्हाला सुरू करायचा आहे. कामगारांचाही विचार व्हावा, असा मुद्दा कामगारांचे कायदा सल्लागार अँड. अजय प्रभुगावकर यांनी मांडला.
शेतकऱ्यांची नुकसानभरपाई बुडवणाऱ्यालाच पुन्हा लीज
खाणीसंदर्भात वेदांत खाण कंपनीने दाखविलेले सादरीकरण हे बनावट आहे. या कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये मये गावातील शेतांची अक्षरश: नाशाडी केली आहे. ही कंपनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यापासून नाचवत आहे. कंपनी सरकारदरबारी डिफॉल्टर आहे. तरीही सरकारने या डिफॉल्टर कंपनीलाच खाण लीज दिले आहे, असे जैवविविधता समितीचे अध्यक्ष सखाराम पेडणेकर यावेळी म्हणाले.
लीजाचे पुन्हा सर्वेक्षण करुन नंतर जनसुनावणी घ्यावी
आरटीआय कार्यकर्ते सपनेश शेर्लेकर व पर्यावरणवादी रमेश गावस यांनी या जनसुनावणीच्या जाहिरातीत या खाण प्रकल्पाला हरित प्रकल्प म्हणून नमूद केल्याबद्दल तीव्र आक्षेप घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारले. त्यावर मिळालेल्या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही. या खाणींमुळे गावातील पर्यावरण, शेती बागायती, घरे, मंदिरे, जलस्रोत यांचा अभ्यास खाण कंपनी व खाण खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे का? असाही सवाल यावेळी विचारण्यात आला. खाणी सुरू करण्याच्या घाईत सर्व लिजांची सीमा आखणी चुकीची करण्यात आले आहे. अहवालात जलस्रोत, नैसर्गिक झरे, तलाव यांची चुकीची माहिती देण्यात आली आहे. या चुकीच्या माहितीच्या आधारावर खाणी सुरू करणे योग्य नाही. त्यासाठी सर्व लिजांची पुन्हा सर्व्हेक्षण करून नंतरच नव्याने जनसुनावणी घ्यावी, अशी जोरदार मागणी रमेश गावस व सपनेश शेर्लेकर यांनी केली.
मुळगाववासीयांचा खाणींना विरोध
मुळगावातील लोकवस्ती, मंदिरे, शेती बागायती यांचा समावेश खाण लिजांमध्ये करण्यात आल्याने मुळगाववासीय संतप्त बनले आहेत. त्याच संतप्त भावनेने मुळगावातील देवस्थान अध्यक्ष वसंत गाड, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर व इतरांनी खाण व्यवसायाला विरोध करताना खाण लिजांमधून गावाला तसेच शेती बागायतींना वगळावे, अशी मागणी केली.
काहींच्या संमिश्र प्रतिक्रिया
कामावरून कमी केलेल्या कामगारांनी आपल्या कामाचा मुद्दा उपस्थित करीत खाणीला विरोध केला. कामावर रूजू झालेल्या कामगारांनी खाण व्यवसायाला पूर्णपणे पाठिंबा दर्शविला. यावेळी उपस्थित सरपंच, उपसरपंच, पंचसदसस्य यांनी मिश्र भूमिका घेतली. गाव, कामगार, पर्यावरण, जलस्रोत राखून खाणी सुरू करण्याचे आवाहन केले. अनेक शेतकऱ्यांनी प्रलंबित असलेल्या नुकसानभरपाईचा मुद्दा प्रकर्षाने पुढे करत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, अन्यथा खाणीच नको, अशी भूमिका घेतली. ट्रकमालक संघटनेने खाणींना पाठिंबा देताना सर्वांना समान न्याय मिळवून देत ट्रकांना काम द्यावे, असा मुद्दा मांडला.
डिचोलीबाहेरील लोकांना बोलण्यास मज्जाव
शिरगाव ते पिळगाव या भागातील शिरगाव, मुळगाव, बोर्डे, डिचोली, पिळगाव, मये, पैरा, या गावातील लोकांना या जनसुनावणीत भाग घेण्याची मूभा होती. त्याप्रमाणे मोठ्या संख्येने या भागातील लोक उपस्थित राहिले होते. परंतु जनसुनावणी सुरू असतानाच या भागाच्या बाहेरील एका व्यक्तीचे नाव घेतल्याने उपस्थित कामगारांनी सदर व्यक्तीला बोलण्यास मज्जाव केला. त्यामुळे काहीकाळ सभागृहात गोंधळ माजला. पोलिसांनी नंतर मध्यस्थी करून प्रकरण नियंत्रणात आणले. तसेच जनसुनावणीत एका व्यक्तीला दहा मिनिटांचा अवधी देण्यात येत होता. दहा मिनिटे संपताच बेल वाजवली जात होती. याच मुद्यावरून एका व्यक्तीने गोंधळ करीत बोलायला पुरेसा वेळ न देत नसल्यास घरी जा, असे म्हटले.
शेतकरी महिला परिस्थिती कथन करताना अश्रू अनावर
सुजलाम सुफलाम असलेले एकेकाळचे गाव व डोंगर आज कसे लालेलाल झालेले आहेत. हे कथन करताना तर काही वृध्द महिलांचे अश्रू अनावर झाले. दाटून आलेल्या कंठातून एका महिलेने गावची आजची परिस्थिती कथन केली. खाणी नकोच असा सूर धरला. तिचे भाषण ऐकताना सभागृहात बसलेल्या इतरही वृध्द महिलांना अश्रू आवरता आले नाही. हे दृष्य अनेकांनी अनुभवले.









