पुणे / प्रतिनिधी :
राज्यात 2018 मध्ये पवित्र प्रणालीद्वारे सुरू होऊन प्रलंबित राहिलेल्या शिक्षक भरतीला पुन्हा एकदा मुहूर्त मिळाला आहे. 196 संस्थांतील 763 रिक्त पदांसाठी मुलाखत पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, संबंधित उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चाचणी शिक्षण संस्थांकडून 18 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली.
2018 मध्ये पवित्र प्रणालीमार्फत 12 हजार पदांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला त्यात सहा ते सात हजार पदांची भरती करण्यात आली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे पुढे ही प्रक्रिया रखडली. आता पुन्हा 30 हजार रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. त्याबरोबरच रखडलेल्या भरती प्रक्रियेतील 196 संस्थांतील 763 रिक्त पदांसाठीही भरती प्रक्रिया होणार आहे.
मुलाखतीसह पदभरतीमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा मागास (एसईबीसी) प खवर्गासाठी जागा असणाऱ्या संस्थांपैकी, ज्या संस्थांच्या जाहिरातीमध्ये खुल्या (समांतर आरक्षणाशिवाय) प्रवर्गासाठी जागा नाहीत, अशा उर्वरित 196 संस्थांसाठी एसईबीसी प्रवर्गासाठीच्या जागा योग्य त्या प्रवर्गामध्ये घेऊन पात्र उमेदवाराकडून नव्याने प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत. त्यात सहावी ते बारावी या गटातील रिक्त पदांसाठी कार्यवाही करण्यात येत आहे. या संस्थांना मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी या पूर्वीच्या तरतुदीनुसार एका जागेसाठी दहा उमेदवार (समांतर आरक्षणासह उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत ) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
त्यासाठी 763 पदांवर निवडीसाठी एकूण 5 हजार 535 प्राधान्यक्रमावर उमेदवारांची शिफारस झाली आहे. मुलाखतीसाठी शिफारस केलेला गट, विषय आणि आरक्षण विचारात घेऊन संस्थांकडून निवड केली जाईल. मुलाखत आणि अध्यापन कौशल्यातून निवड होऊन शाळेत रुजू होणाऱया उमेदवारांना शालार्थ प्रणालीमार्फत वेतन सुरू होणार असल्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले.








