कचरा डेपो हलविण्यासाठी प्रयत्न करणार : लक्ष्मी हेब्बाळकर
वार्ताहर/उचगाव
तुरमुरी येथील कचरा डेपो भागातील खुल्या जागेवर पुन्हा संबंधित कचरा डेपोच्या अधिकारी वर्गाने अतिक्रमण करून पुन्हा सपाटीकरणाचा घाट घातल्याने तुरमूरी गावातील संतप्त नागरिकांनी कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन कचरा डेपोअधिकारी वर्गाने चालू केलेले सपाटीकरणाचे काम त्वरित थांबवावे आणि हा कचरा डेपो तातडीने इथून हलवावा अशा आशयाचे निवेदन मंगळवारी सायंकाळी देण्यात आले. सदर कचरा डेपो तातडीने हलविण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन असे आश्वासन यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला दिले आहे.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यामधून पावसाळ्यात पाणी झिरपून ते नजीकच्या विहिरीमध्ये मिसळते. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. या पाण्यामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य बिघडलेले आहे. रोजच्या प्रचंड दुर्गंधीमुळे जगणे मुश्कील झाले आहे. पिकावरही साऱ्याचाच परिणाम झाल्याने पिके खराब होत आहेत. याचबरोबर भटक्या कुत्र्यांचे सातत्याने नागरिकांवर होणारी हल्ले, वारंवार घिरट्या घालणाऱ्या घारी, पक्षी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा तक्रारी लक्ष्मी हेब्बाळकर यांना भेटावयाला गेलेला शिष्टमंडळाने केल्या. यावेळी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष नागनाथ जाधव ,चंद्रकांत जाधव, मारुती खांडेकर, रघुनाथ खांडेकर, बाळू बेळगावकर, बंडू कुद्रेमणीकर, लक्ष्मण जाधव, राजू खांडेकरसह नागरिक उपस्थित होते.









