33 वर्षे जुने प्रकरण : यासीन मलिकच्या अडचणी वाढणार
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरचे निवृत्त न्यायाधीश नीलकंठ गंजू यांच्या हत्या प्रकरणाची फाइल पुन्हा उघडण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर तपास यंत्रणेने (एसआयए) 33 वर्षे जुन्या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यासाठी लोकांकडून माहिती जमविण्यास प्रारंभ केला आहे. एसआयएने या हत्येशी निगडित असलेली माहिती पुरविण्याचे आवाहन लोकांना केले आहे. यासिन मलिकने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत न्यायाधीश गंजू यांच्या हत्येची कबुली दिली होती. या गुन्ह्याप्रकरणी मलिकला मृत्युदंड ठोठावण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.
नीलकंठ गंजू यांची श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. गंजू हे सत्र अन् जिल्हा न्यायालयात न्यायाधीश होते. गंजू यांनी एका खटल्यात जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा संस्थापक मकबूल भट्टला मृत्युदंड ठोठावला होता. यानंतर ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवली होती.
1966 मध्ये पोलीस निरीक्षक अमर चंद यांची हत्या करण्यात आली होती. याच प्रकरणी 1968 मध्ये मकबूल भट्टला दोषी ठरवत तत्कालीन सत्र आणि जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश नीलकंठ गंजू यांनी मृत्युदंड सुनावला होता. 1984 मध्ये मकबूल भट्टला तिहार तुरुंगात फासावर लटकविण्यात आले होते. यानंतर 4 नोव्हेंबर 1989 रोजी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी गंजू यांची हत्या केली होती.
एसआयएने गंजू यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करत लोकांना यासंबंधीची माहिती पुरविण्याचे आवाहन पेल आहे. माहिती पुरविणाऱ्या लोकांची ओळख गुप्त ठेवण्यात येईल असेही एसआयएने म्हटले आहे. एसआयएकडून एक फोन क्रमांक अन् ईमेल आयडी जारी करण्यात आला आहे.









