वाहनधारकांना धोका : तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी
बेळगाव : 24 तास पाणी योजनेसाठी एल अँड टी कडून सरदार्स हायस्कूल रोडची दुसऱ्यांदा खोदाई केली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी जलवाहिनी घालण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे परिसरातील रहिवासी व व्यापाऱ्यांना धुळीचा सामना करावा लागता होता. यानंतर दुसऱ्या बाजूला पुन्हा खोदकाम करून जलवाहिनी घालण्याचे काम सुरू करण्यात आल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या चार वर्षांपासून एल अँड टी कडून शहरात 24 तास पाणी योजना राबविण्यासाठी जिकडे तिकडे खोदकाम केले जात आहे. मात्र याचा नाहक त्रास बेळगावकरांना सहन करण्याची वेळ आली आहे. खोदकाम करण्यात आलेल्या ठिकाणचे काम पूर्ण करण्याऐवजी अर्धवट स्थितीत काम सोडून पुन्हा दुसरीकडे काम हाती घेतले जात आहे.
विविध ठिकाणी अर्धवट स्थितीत असलेल्या कामांचा फटका रहिवाशांना सहन करावा लागत आहे. पाईप लाईन घालण्यासाठी खोदलेल्या चरी बुजविण्यात आल्या नसल्याने उन्हामुळे धूळ उडत आहे. त्यावर टँकरद्वारे पाण्याची फवारणी केली जात आहे. गुरुवारी झालेल्या महापालिका सभागृहात झालेल्या बैठकीत एल अँड टी अधिकाऱ्यांची नगरसेवकांनी चांगलीच खरडपट्टी केली आहे. पाणीपुरवठा व्यवस्थित नाही, त्याचबरोबर योजनेचे काम रखडले असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. विविध ठिकाणच्या समस्या येत्या 15 दिवसांत मार्गी न लागल्यास महापालिकेसमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. त्यामुळे एल अँड टीचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी सरदार्स हायस्कूल रोडच्या एका बाजूला खोदकाम करून जलवाहिनी घालण्यात आली आहे. यानंतर आता दुसऱ्या बाजूलाही जलवाहिनी घातली जात आहे. मात्र सदर काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.









