राज्य सरकारचा निर्णय : निवड यादी रद्द, गैरव्यवहारातील प्रमुख आरोपीसह 5 जणांना पुण्यात अटक
प्रतिनिधी/ बेंगळूर
पोलीस उपनिरीक्षकपदांच्या नेमणुकीतील गैरव्यवहार प्रकरणी प्रमुख आरोपी दिव्या हागरगी यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारने एप्रिल महिन्यात घेतलेल्या 545 पीएसआय परीक्षेतील निवड यादी रद्द केली असून नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 54,289 उमेदवारांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
बेंगळूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पीएसआय नेमणूक परीक्षेत गैरव्यवहार झाल्याने फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असून पुनर्परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल. याआधी परीक्षा दिलेल्या 54,289 उमेदवारांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यात येईल. नेमणूक गैरव्यवहार सहभागी झालेल्या उमेदवारांना मात्र संधी दिली जाणार नाही. प्रतिभावंत उमेदवारांवर अन्याय होऊ नये हा यामागील उद्देश आहे, अस ते म्हणाले.
पीएसआय नेमणूकसह अनेक परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आगामी काळात अशा प्रकारचे गैरव्यवहार होऊ नयेत याकरिता कायदा तयार करण्यात येईल. ‘पैशांसाठी सरकारी पदे’ असा समज दूर करण्यासाठी हा कायदा केला जाणार आहे. बेंगळूरमधील काही परीक्षा केंद्रांवरही गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे, असे गृहमंत्री म्हणाले.
पीएसआय पदांची परीक्षा पोलीस खात्यामार्फत घ्यावी की अन्य परीक्षा प्राधिकरणामार्फत, नव्या परीक्षा केंद्रांमध्ये परीक्षा घ्यावी का, याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. त्यानंतरच परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार आहे. प्रतिभावंतांनी आत्मविश्वास गमावू नये. विश्वासाने पुन्हा परीक्षेची तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
गैरव्यवहारात पोलीस खात्यातील अधिकारी असोत किंवा कोणताही राजकारणी, त्यांची गय केली जाणार नाही. सीआयडी पोलिसांना संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. गैरव्यवहार केलेल्यांच्या मुसक्या आवळून समाजासमोर आणण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
18 दिवसांपासून प्रमुख आरोपी फरार
पीएसआय नेमणूक गैरव्यवहार प्रकरणी 18 दिवसांपासून फरार असणाऱया प्रमुख आरोपी दिव्या हागरगी यांच्यासह पाच जणांना गुरुवारी रात्री पुणे येथे अटक करण्यात सीआयडी पोलीस यशस्वी ठरले आहेत. त्यांना गुलबर्गा येथील सीआयडीच्या कार्यालयात आणून चौकशी केली जात आहे. सीआयडीचे एसपी राघवेंद्र हेगडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या 22 वर पोहोचली आहे.
गुलबर्गा येथील ज्ञानज्योती इंग्रजी माध्यम शाळेत पोलीस नेमणुकीच्या परीक्षेवेळी ब्ल्यूटुथ डिव्हाईसद्वारे उत्तरे सांगण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपविले होते. त्यानंतर या शाळेच्या सचिव दिव्या हागरगी आणि काहीजण फरार झाले होते. गुरुवारी या प्रकरणात शहाबाद नगरपालिकेच्या द्वितीय श्रेणी साहाय्यक आरोपी ज्योती पाटील हिला अटक करण्यात आली होती. चौकशीवेळी ज्योतीने दिव्या पुण्यामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार पुण्यात गेलेल्या सीआयडीच्या पथकाने दिव्या हागरगीसह त्यांच्या शाळेतील शिक्षिका अर्चना, कारचालक सद्दाम, सुरेश काटेगाव आणि कालिदास यांच्या मुसक्या आवळल्या.
गुलबर्ग्यातील ज्ञानज्योती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पीएसआय परीक्षेवेळी गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस येताच या शाळेच्या सचिव दिव्या हागरगी फरार झाल्या होत्या. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी व्यापक जाळे विणले होते. तरी सुद्धा त्यांचा शोध लागला नव्हता. दरम्यान, काँग्रेसने दिव्या भाजपच्या स्थानिक नेत्या असून या पक्षातील नेतेच गैरव्यवहारात सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे भाजपची कोंडी झाली होती. आता 18 दिवसांनंतर दिव्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यांच्या पतीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
3 ऑगस्ट 2021 रोजी 545 पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. 19 जानेवारी 2022 रोजी तात्कालिक निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. नेमणूक प्रकरणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार काही उमेदवारांनी केली होती. या तक्रारीच्या आधारे गृहखात्याने हे प्रकरण सीआयडीकडे सोपविले होते.
आश्रय देणारा महाराष्ट्रातील उद्योजकही अटकेत
पीएसआय नेमणूक गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी दिव्या हागरगी यांना आश्रय दिलेल्या महाराष्ट्रातील उद्योजक सुरेश काटेगाव यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री दिव्या आणि त्यांच्यासमवेत असणाऱयांचा शोध घेण्यासाठी आलेल्या सीआयडीच्या पथकाला ते सर्वजण सुरेश यांच्या पुण्याबाहेरील बंगल्यात आढळून आले होते. त्यामुळे आरोपींना आसरा दिल्याच्या कारणावरून सुरेश काटेगाव यांना तर सहकार्य केल्याच्या आरोपावरून कालिदास यांना अटक करण्यात आली आहे.
प्रकरणाला नवे वळण
दिव्या हागरगी यांच्या अटकेनंतर या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळणार आहे. गुरुवारी अटक करण्यात आलेल्यांकडून चौकशीवेळी मिळणारी माहिती प्रकरणाला कोणत्या वळणावर घेऊन जाते, हा कुतूहलाचा विषय बनला आहे. दिव्या हागरगी यांच्यासमवेत गैरव्यवहारात सहभागी असणारा आणखी एक आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ज्ञानज्योती इंग्रजी माध्यम शाळेचा मुख्याध्यापक काशिनाथ आणि अभियंता मंजुनाथ मेळकुंद हे फरार असून त्यांचाही शोध जारी आहे.









