उद्यापासून धार्मिक कार्यांना प्रारंभ, सुमारे 50 लाख खर्चून देवस्थानची नव्याने उभारणी
प्रतिनिधी /काणकोण
महालवाडा, पैंगीण येथील श्री बेताळ देवालयाचे बांधकाम पूर्णत्वाच्या वाटेवर असून श्री आदिपुरुष देवालयाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. श्री परशुराम पंचैग्राम देवालयांपैकी एक प्रमुख देवस्थान म्हणून या देवालयाकडे पाहिले जाते. श्री परशुराम, श्री पुरुषोत्तम, श्री नवदुर्गा, श्री आदिपुरुष आणि श्री बेताळ अशी ही देवालये असून या देवतांमधील श्री आदिपुरुष हे चौथे देवालय आहे. याच क्रमाने पंचैग्राम दैवतांचे दर्शन घेतले जात असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष उदय प्रभुगावकर यांनी दिली.
24 नोव्हेंबर, 2016 रोजी देवस्थान समिती, तिन्ही गावांतील ग्रामस्थ-महाजन प्रतिनिधी, सेवाजन प्रतिनिधी, पुरोहित, अर्चक, भाविक यांच्या संयुक्त बैठकीत श्री आदिपुरुष देवालयाच्या पुनर्बांधणीवर चर्चा करण्यात आली होती. देवालयाचे बांधकाम शक्यतो काँक्रेटचा वापर टाळून ताम्रपत्र आच्छादित शिखर कलशयुक्त असावे, असे निश्चित करून त्याप्रमाणे आराखडा तयार करून घेण्यात आला. हा आराखडा पल्लवी माधव कामत यांनी तयार केला असून माधव कामत या अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या परिसरातील एक आकर्षक असे बांधकाम या मंदिराचे झालेले असून यासाठी अनेक दात्यांनी उदारहस्ते दिलेल्या देणग्या, देणगी कुपन्सची विक्री, वृक्षदान, वस्तू दान आणि उत्स्फूर्तपणे केलेले श्रमदान यामुळेच हे शिवधनुष्य पेलणे शक्य झाले असल्याचे मत प्रभुगावकर यांनी मांडले.
या देवालयाच्या बांधकामासाठी अंदाजे 50 लाख रु. इतका खर्च आलेला असून या देवालयात स्तंभ पुनःप्रतिष्ठा, शिखर कलश प्रतिष्ठा आणि परिवार देवता प्रतिष्ठा 6 मे रोजी होणार आहे. श्री आदिपुरुष परिवार दैवतांमध्ये श्री निराकार, श्री मूळवीर, श्री खंडेराय, श्री सातेरी अशी दैवते असून या सर्व दैवतांची प्रतिष्ठा या दिवशी होणार आहे. श्री आदिपुरुष आणि परिवार दैवतांची नैवेद्य पूजा दर सोमवारी आणि विशिष्ट पर्वणीच्या दिवशी केली जाते. श्री आदिपुरुष आणि श्री मूळवीर या दैवतांचे प्रातिनिधीक प्रतीक खांब, तरंगे व श्री निराकार दैवताचा मोरपीसयुक्त कुचा दरवर्षी नवरात्रोत्सव, विजयादशमीला तसेच टका संचार व गडय़ांची जत्रा या उत्सवांत पूजला जातो, असे त्यांनी सांगितले.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी म्हणजे 3 मेपासून धार्मिक विधींना प्रारंभ होणार असून 6 मे रोजी सकाळी प्राकारशुद्धी, स्थापित दैवतापूजन, तत्त्व होम, मुख्य देवता प्रतिष्ठा, परिवार देवता प्रतिष्ठा, महापूजा, पुर्णाहुती, प्रार्थना, ब्राह्मण संभावना, दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, तर संध्याकाळी 5 वा. सभा कार्यक्रम होईल. त्यानंतर होणाऱया रंगपूजेने या कार्यक्रमांची सांगता होणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष प्रभुगावकर यांनी दिली.









