गाळे रिकामे करण्यास अनुत्सुक : 205 गाळ्यांच्या भाडे कराराची मुदत संपुष्टात
बेळगाव : महापालिकेच्या महसूल वाढीसाठी व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येतात. 205 गाळ्यांच्या भाडे कराराची मुदत संपुष्टात आली असून काही गाळ्यांसाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद लाभला नसल्याने नव्याने लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया लवकरच राबविली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी मागील वर्षभरात चारवेळा निविदा प्रक्रिया मागविली होती. काही गाळ्यांना बोली लावण्यात आली. मात्र फिशमार्केट, मटणमार्केट, महात्मा फुले भाजी मार्केट, नेहऊनगर येथील गाळे त्याचप्रमाणे अन्य ठिकाणाच्या गाळ्यांना प्रतिसाद लाभला नाही. चार ते पाचवेळा लिलाव राबवूनही बोली लावण्यात आली नाही. मात्र यापैकी फिश मार्केट आणि मटणमार्केटचा तसेच महात्मा फुले भाजीमार्केटचा वापर सुरू आहे. सदर गाळे ताब्यात घेण्यास महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. परिणामी गाळ्यांचा वापर मोफतरित्या सुरू आहे. महापालिकेला या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. लिलाव झालेले गाळेदेखील हस्तांतर करण्यास मनपाच्या महसूल विभागाने चालढकल चालविली आहे. त्यामुळे काही गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
बोलीला प्रतिसाद मिळणार का?
महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी प्रत्येक तीन वर्षांतून एकदा घरपट्टीत वाढ केली जाते. मात्र कोट्यावधी रुपये महसूल मिळणाऱ्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून वेळेवर भाडेवसूल करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. घरपट्टीची रक्कम वेळेत भरली नसल्यास मालमत्ताधारकांकडून 24 टक्के दंड आकारला जातो. मात्र गाळेधारकांना मात्र फुकट गाळे वापरण्यास मुभा दिली जाते. तर गाळ्यांचा ताबा घेण्यापूर्वीच पुन्हा एकदा लिलाव प्रक्रिया राबविण्याचा विचार महापालिका प्रशासनाने चालविला आहे. 205 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने तयार केला आहे. प्रशासकीय राजवटीत महापालिका आयुक्तांची मंजुरी घेऊन लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत होती. मात्र आता सभागृहात किंवा स्थायी समिती बैठकीच्या विषय पत्रिकेवर हा प्रस्ताव ठेवून मंजुरीनंतरच लिलाव राबवावा लागणार आहे. त्यादृष्टीने महसूल विभागाने तयारी चालविली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तर महापालिकेच्या लिलावावेळी बोलीला प्रतिसाद मिळणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.









