अभिषेक यादव उत्कृष्ट खेळाडू, चैतन्य रामगुरवाडी उत्कृष्ट कुशलपटू

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आरडीएस फुटबॉल अकादमी आयोजित दुसऱ्या आरडीएस चषक सिक्स ए साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गोवा श्री सातेरी संघाने फास्ट फॉर्वड संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. अभिषेक यादव याला उत्कृष्ट खेळाडू तर चैतन्या रामगुरवाडी याला उत्कृष्ट कुशलपटू म्हणून गौरविण्यात आले.
पीच फुटबॉल मैदानावरती आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत जवळपास 28 संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेच्या अंतिम सामना श्री सातेरी गोवा व फास्ट फॉर्वड बेळगाव यांच्यात झाला. या सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये श्री सातेरी गोवा संघाने फास्ट फॉर्वड संघाचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव करुन आरडीएस चषक पटकाविला.
बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे टिळकवाडी पोलीस स्थानकाचे सीपीआय दयानंद शिगुलशी, राहुल देशपांडे यांच्या हस्ते विजेत्या श्री सातेरी गोवा संघाला 15 हजार रु. रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या फास्ट फॉर्वड संघाला 7500 रु. व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून अभिषेक यादव (गोवा) तर उत्कृष्ट कुशलपटू हे बक्षीस चैतन्य रामगुरवाडी याला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आरडीएसच्या कार्यकर्त्यानी विशेष परिश्रम घेतले.









