राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची उपस्थिती
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठ (आरसीयू) चा बारावा दीक्षांत सोहळा मंगळवार दि. 3 रोजी होणार आहे. सकाळी 11 वाजता विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल थावरचंद गेहलोत, उच्च शिक्षणमंत्री डॉ. एम. सी. सुधाकर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून मंगळूर येथील निट्टे युनिव्हर्सिटीचे सल्लागार डॉ. इड्ड्या करुणासागर उपस्थित राहणार असल्याची माहिती आरसीयूचे कुलगुरु प्रा. सी. एम. त्यागराज यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. बेळगावच्या संगोळ्ळी रायण्णा फर्स्ट ग्रेड कॉलेजमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावर्षी विद्यापीठाकडून समाजात उल्लेखनीय योगदान दिलेल्या तीन व्यक्तींना मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे.
कलाक्षेत्रातील पद्म़श्री पंडित एस. बल्लेश भजंत्री, उद्योजकता आणि समाजसेवा क्षेत्रातील गोपाल जिनगौडा तर सामाजिक कार्यासाठी निवृत्त आयपीएस गोपाळ होसूर यांचा यामध्ये समावेश आहे. यावर्षी एकूण 123 संशोधकांना पीएचडी पदवी प्रदान केली जाणार आहे. परीक्षांमध्ये उत्तम गुण घेतलेल्या अकरा विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरविले जाणार आहे. यावर्षी आरसीयुतून एकूण 44 हजार 264 विद्यार्थ्यांना पदवी दिली जाणार आहे. यामध्ये आर्ट्स विभागात 17 हजार 317, कॉमर्स 14 हजार 092, शिक्षण विभागातून 4 हजार 179 तर सायन्स विभागातून 8 हजार 676 विद्यार्थ्यांना पदवी दिली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हिरेबागेवाडी येथील नव्याने बांधण्यात येत असलेल्या विद्यापीठ कॅम्पसचे काम प्रगतिपथावर आहे. अनेक इमारती अंतिम टप्प्यात आल्या असून त्या ठिकाणी सुसज्ज विद्यापीठ सुरू केले जाईल, असे कुलगुरुंनी सांगितले. यावेळी मूल्यमापन विभागाचे रजिस्ट्रार रवींद्र कदम, रजिस्ट्रार संतोष कामगौडा, फायनान्स ऑफिसर एम. ए. सपना व चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते.









