विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर : मात्र विद्यापीठाकडून समर्थन
बेळगाव : पीएचडी अभ्यासक्रमाच्या दांडीबहाद्दर संशोधकांवर आरसीयूने शिस्तभंगाची कारवाई केली आहे. कार्यशाळांना अनुपस्थित संशोधकांवर अडीच हजारांपासून दहा हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला आहे. विद्यार्थ्यांना संशोधनाची जाणीव व्हावी यासाठी ही कारवाई करण्यात आली असली तरी दंडाची रक्कम मोठी असल्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. यावर्षी राणी चन्नम्मा विद्यापीठातून 419 संशोधक पीएचडी अभ्यासक्रमासाठी संशोधन करत आहेत. यापैकी 194 विद्यार्थी वर्कशॉपसाठी उपस्थित राहत आहेत, तर उर्वरित 229 विद्यार्थी अनुपस्थित राहत असल्याने सिंडिकेट सदस्यांच्या सूचनेनुसार दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला. एका वर्कशॉपला अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्याला अडीच हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. वर्षाला एकूण चार वर्कशॉप असल्याने काही विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
वारंवार सूचना करूनही संशोधक विद्यार्थ्यांकडून शिस्तभंग केले जात आहे. केवळ अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यात आला असून त्यानंतर संशोधनाच्यादृष्टीने कोणतीच प्रगती नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. यापुढे कार्यशाळा अथवा उपक्रमांना अनुपस्थित राहिल्यास त्यांची पीएचडीच रद्द करण्याचा इशारा विद्यापीठाने दिला आहे. विद्यापीठामध्ये नियमित व बहिस्थ पद्धतीने विद्यार्थी पीएचडी करीत आहेत. परंतु काही विद्यार्थी कार्यशाळा अथवा इतर कोणत्याही शैक्षणिक उपक्रमांना उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. केवळ प्रवेश घेऊन पीएचडी करता येणार नाही, तर त्यासाठी अभ्यासातील सातत्य गरजेचे आहे. बऱ्याच संशोधकांना संशोधनपर लेखन करता येत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे अनुपस्थित विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दंडाच्या रकमेतून पुस्तके खरेदी करून ती पुन्हा विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत.
दंडात्मक कारवाई
विद्यापीठामध्ये नियमित व बहिस्थ पद्धतीने विद्यार्थी पीएचडीचा अभ्यास करत आहेत. नियमित विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून मासिक दहा हजार रुपये अभ्यास वेतन दिले जाते. परंतु बहिस्थ विद्यार्थ्यांना अशी कोणतीही सोय नाही. इतरत्र नोकरी करून ते पीएचडी मिळवत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने दंडाची रक्कम कमी करावी, अशी मागणी विद्यार्थीवर्गातून होत आहे.
-प्रा. सी. एम. त्यागराज (कुलगुरु, आरसीयू)









