बी. कॉम शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाने (आरसीयू) 6 व्या सेमिस्टरचा जाहीर केलेल्या निकालाने गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात गैरहजर किंवा चांगला पेपर देऊनही नापास, असे नमूद केले आहे. यासाठी विद्यापीठाने एकतर पुनर्परीक्षा किंवा ग्रेस मार्क देऊन पास करण्याची मागणी गोगटे महाविद्यालय व बेननस्मिथ मेथोडिस्ट कॉलेच्या विद्यार्थ्यांनी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आरसीयूने काही दिवसांपूर्वी बी. कॉमचा 6 व्या सेमिस्टरचा निकाल दिला. निकालामध्ये सावळागोंधळ झाल्याने अनेक विद्यार्थी आयटीआर विषयात हजर असूनही गैरहजर तर काही विद्यार्थ्यांनी चांगली परीक्षा देऊनही नापास म्हणून निकाल जाहीर केला आहे. या गोंधळानंतर काही विद्यार्थ्यांना पास केले आहे. मात्र अद्याप 200 विद्यार्थ्यांना निकालामध्ये नापास असे दिसून येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना नापास असे दिसून येत आहे. अशा विद्यार्थ्यांनी आयटीआर पेपरची उत्तरपत्रिका कॉपी देण्यासाठी अर्ज केला होता. उत्तरपत्रिका दिल्यानंतर सदर विषयाच्या शिक्षकांनी तपासून पाहिले असता विद्यार्थ्यांना पासिंग मार्क मिळत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत सांगितले असता याची दखल घेण्यात आलेली नाही.
आरसीयूकडून दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांच्या समस्येत भर
सदर विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा घेण्याची विनंती केली असता यालाही प्रतिसाद मिळाला नाही. नापास असे नमूद असलेले विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यापीठाकडे सदर विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देऊन पास करण्याची विनंती केली होती. याचीही दखल घेतली नसल्याने विद्यार्थ्यांच्या समस्येत मोठी भर पडली आहे. दरम्यान आरसीयूने सदर विद्यार्थ्यांसाठी त्वरित आयटीआर विषयाची पुनर्परीक्षा घेऊन सदर निकाल पारदर्शकपणे जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली.









