संजदचे माजी अध्यक्ष : मागील वर्षी सोडली होती नितीश कुमारांची साथ
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
माजी केंद्रीय मंत्री आणि संजदचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आरसीपी सिंह यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात आयोजित मिलन सोहळ्यात त्यांनी भाजपचे अधिकृत सदस्यत्व स्वीकारले आहे. तर दुसरीकडे संजदच्या प्रवक्त्या सुहेली मेहता यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी पाटणा येथे भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. मागील वर्षभरापासून आरसीपी सिंह हे भाजपमध्ये दाखल होणार असल्याचा कयास वर्तविला जात होता. आरसीपी सिंह यांच्या भाजप प्रवेशावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जगतप्रकाश न•ा उपस्थित होते. आरसीपी सिंह हे मोदी सरकारमध्ये सुमारे वर्षभरापर्यंत केंद्रीय मंत्री राहिले आहेत. दोन दशकांपेक्षा अधिक काळापर्यंत ते नितीश कुमार यांचे सहकारी म्हणून कार्यरत होते. भाजपच्या मदतीने संजदला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याचा आणि अनेक ठिकाणी अवैध मालमत्ता मिळविल्याचा आरोप आरसीपी सिंह यांच्यावर करण्यात आला होता. नितीश कुमार यांची अनुमती न घेताच केंद्रीय मंत्री होण्याचा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. स्वत:वर अनेक आरोप झाल्यावर आरसीपी सिंह यांनी संजदला सोडचिठ्ठी दिली होती. आरसीपी सिंह यांना नितीश कुमार यांचा गृहजिल्हा नालंदा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याप्रमाणे आरसीपी सिंह देखील कुर्मी समुदायाशी संबंधित आहेत. आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून नितीश कुमार यांच्या सामाजिक समीकरणाला खिंडार पाडता येईल, असा भाजपला विश्वास आहे. भाजप आता उपेंद्र कुशवाह यांना पक्षात सामील करणार असल्याचे मानले जात आहे.









