एकतर्फी विजयासह राजस्थान रॉयल्सची अंतिम फेरीत धडक
अहमदाबाद / वृत्तसंस्था
प्रसिद्ध कृष्णा-ओबेड मकॉयचे एकत्रित 6 बळी आणि जोस बटलरच्या (नाबाद 106) झंझावाती शतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा अक्षरशः एकतर्फी धुव्वा उडवत आयपीएलच्या अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. प्रारंभी, आरसीबीला प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 157 धावांवर समाधान मानावे लागले तर प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 18.1 षटकात 3 बाद 161 धावांसह सहज विजय संपादन केला. जोस बटलरने 60 चेंडूत 10 चौकार व 6 षटकारांसह नाबाद 106 धावांची आतषबाजी केली.

विजयासाठी 158 धावांचा पाठलाग करताना राजस्थानतर्फे यशस्वी जैस्वाल (13 चेंडूत 21) व बटलर यांनी 5.1 षटकातच 61 धावांची सलामी दिली आणि त्यानंतर बटलरने झंझावाती शतक साजरे करत राजस्थानला सहज विजय संपादन करुन दिला. बटलर शतकासमीप असताना हेतमेयरने फटकेबाजीला मुरड घालत एकेरी धावा जमवण्यावर भर दिला. बटलरने चौकार फटकावत शतक साजरे केले आणि त्यानंतर 19 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार खेचत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
प्रारंभी, हॅझलवूडने जैस्वालला पॉईंटवरील कोहलीकरवी झेलबाद केले. पण, तोवर जैस्वालने आपली जबाबदारी चोख पार पाडली होती. जैस्वाल बाद झाल्यानंतर बटलरने संजू सॅमसनच्या साथीने आपली मोहीम पुढे सुरु ठेवली.
कृष्णा-मकॉयचा भेदक मारा

प्रसिद्ध कृष्णा व मकॉय यांनी एकत्रित 6 बळी घेतल्यानंतर आरसीबीला 8 बाद 157 धावांवर समाधान मानावे लागले. रजत पाटीदारने 42 चेंडूत सर्वाधिक 58 धावांचे योगदान दिले असले तरी त्याचे प्रयत्न एकाकीच ठरले. शेवटच्या 5 षटकात राजस्थानने केवळ 34 धावांमध्ये 5 बळी घेतले आणि हा देखील या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.
यापूर्वी, एलिमिनेटर लढतीत शतक झळकावणाऱया पाटीदारने येथेही आत्मविश्वासाने फलंदाजी साकारली. मात्र, हाय प्रोफाईल सलामीवीर विराट कोहली (7), फॅफ डय़ू प्लेसिस (25) अपेक्षित प्रभाव टाकू शकले नाहीत आणि येथे आरसीबीला बॅकफूटवर जावे लागले. ट्रेंट बोल्टने (1-28) पॉवर प्लेमध्ये अप्रतिम इनस्विंगर्सचा मारा केला.
प्रारंभी, कोहलीने बोल्टनला डीप स्क्वेअर लेगवरुन उत्तुंग षटकार खेचत जोरदार सुरुवात केली. पण, नंतर कृष्णाच्या गोलंदाजीवर बेजबाबदार फटका लगावत तो बाद झाला. अपेक्षेपेक्षा जास्त उसळलेल्या चेंडूला लांबून स्टीयर करण्याच्या प्रयत्नात त्याने यष्टीमागे सोपा झेल दिला.
पुढे, पाटीदार व प्लेसिस ही मागील सामन्यातील जोडी येथेही जमली. रजत पाटीदारला रियान परागने बॅकवर्ड पॉईंटवर दिलेले जीवदान आश्चर्याचा धक्का देणारे ठरले. पाटीदार व प्लेसिसने बॅकफूटवर जात कव्हर ते बॅकवर्ड पॉईंटदरम्यान धावा घेण्यावर अधिक भर दिला.
पाटीदारने अश्विन व चहल या दोन्ही फिरकीपटूंचा उत्तम समाचार घेतला. मॅक्सवेलने या दोघांनाही प्रत्येकी एका षटकारासाठी पिटाळून लावले. पण, बोल्टने त्याला पूलच्या मोहात टाकले आणि डीप फाईन लेगवरुन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मॅक्सवेलने मकॉयकडे झेल दिला. रॉयल्सच्या गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये आरसीबीला बरेच जखडून ठेवले. प्रसिद्ध कृष्णाने बहरातील दिनेश कार्तिक व वणिंदू हसरंगा यांना सलग दोन चेंडूंवर बाद करत आरसीबीच्या अडचणीत आणखी भरच टाकली.
संक्षिप्त धावफलक
आरसीबी ः 20 षटकात 8 बाद 157 (रजत पाटीदार 42 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांसह 58, फॅफ डय़ू प्लेसिस 27 चेंडूत 3 चौकारांसह 25, ग्लेन मॅक्सवेल 13 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारांसह 24, शाहबाज अहमद 8 चेंडूत नाबाद 12. अवांतर 15. प्रसिद्ध कृष्णा 4 षटकात 3-22, ओबेड मकॉय 4 षटकात 3-23, ट्रेंट बोल्ट, रविचंद्रन अश्विन प्रत्येकी 1 बळी).
राजस्थान रॉयल्स ः 18.1 षटकात 3 बाद 161 (जोस बटलर 60 चेंडूत 10 चौकार, 6 षटकारांसह नाबाद 106, सॅमसन 23, यशस्वी जैस्वाल 21, हेतमेयर नाबाद 2. जोश हॅझलवूड 2-23, हसरंगा 1-26).
अन् 4 बाद 130 वरुन आरसीबी 8 बाद 157!
प्रारंभी, नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर फलंदाजीला उतरावे लागलेल्या आरसीबीची आघाडी लाईनअप सपशेल कोसळत राहिली आणि त्यानंतर मध्यफळीचीही घसरगुंडी उडाल्यानंतर त्यांच्या अडचणीत आणखी भरच पडली. विराट, प्लेसिस, मॅक्सवेल स्वस्तात बाद झाल्यानंतर रजत पाटीदार 58 धावांवर परतला आणि आरसीबीची 4 बाद 130 अशी स्थिती झाली. पण, उर्वरित फलंदाजांनीही निराशाच केली आणि यामुळे पाहता पाहता आरसीबीचा डाव 8 बाद 157 असा गडगडला.
आरसीबीच्या डावाला प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मकॉयचा सुरुंग
मागील सामन्यात सपाटून मार खाणाऱया राजस्थानच्या प्रसिद्ध कृष्णाने येथे मात्र जोरदार कमबॅक करत 22 धावात 3 बळी घेतले तर ओबेड मकॉयने देखील 23 धावात 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. या दोघांनी एकत्रित 6 बळी घेतल्यानंतर तेथेच आरसीबीच्या डावाला जोरदार सुरुंग लागला.
जोस बटलरचा झंझावात आणि राजस्थानचा विजय निव्वळ औपचारिकता!
विजयासाठी 158 धावांचे तुलनेने किरकोळ आव्हान असताना राजस्थानतर्फे जोस बटलरचा झंझावात पुन्हा एकदा अवतरला आणि बटलरच्या शतकी खेळीमुळे राजस्थान रॉयल्सचा विजय ही निव्वळ औपचारिकता होती.
उद्या जेतेपदासाठी गुजरात-राजस्थान यांच्यात निर्णायक फायनल
दि. 26 मार्चपासून सुरु असलेल्या यंदाच्या आयपीएल स्पर्धेला दोन महिन्यांचा कालावधी लोटला असून उद्या (दि. 29 मे) जेतेपदासाठी होणाऱया निर्णायक फायनल लढतीने स्पर्धेची सांगता होईल. गुजरात टायटन्स व राजस्थान रॉयल्स यावेळी जेतेपदासाठी आमनेसामने भिडतील.









