पंजाबचा 5 गड्यांनी दणदणीत विजय : नेहाल वढेराची शानदार खेळी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
शुक्रवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात आरसीबीच्या संघाने टीम डेव्हिडच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर 95 धावांपर्यंत मजल मारली होती. पंजाबने विजयासाठीचे लक्ष्य 12.1 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजय मिळवला. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
पंजाबचा संघ आरसीबीच्या 96 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला खरा, पण त्यांनाही एकामागून एक धक्के बसले. सलामीवीर प्रभसिमरन सिंग 13 धावा करत भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला तर युवा सलामीवीर प्रियांश आर्या यावेळी 16 धावा करत माघारी परतला. यानंतर फलंदाजीला आलेला कर्णधार श्रेयस अय्यर सपशेल अपयशी ठरला. त्याला सहा धावाच करता आल्या. त्यामुळे पंजाबची अवस्था ही 8 षटकांनंतर 4 बाद 63 अशी झाली होती. त्यामुळे हा सामना चांगलाच रंगतदार अवस्थेत आला होता. पण त्यानंतर नेहाल वढेराने दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. वढेराने 19 चेंडूत 3 चोकार व 3 षटकरासह नाबाद 33 धावांचे योगदान दिले. त्याला मार्क स्टोनिसने नाबाद 7 धावा करत चांगली साथ दिली. पंजाबने विजयासाठीचे लक्ष्य 11 चेंडू राखत पार केले. या विजयासह त्यांनी पॉइंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान पटकावले.
a
घरच्या मैदानात आरसीबीला पराभवाचा धक्का
पावसामुळे सव्वा 2 तासांचा खेळ वाया गेल्याने 6-6 ओव्हर कापण्यात आल्या. नाणेफेक जिंकत पंजाबने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. आरसीबीने चौकारापासून सुरुवात केली खरी, पण त्यांना त्यानंतर एकामागून एक धक्के बसत गेले. सलामीवीर फिल सॉल्ट चार धावांवर बाद झाला. विराट कोहली या सामन्यात फॉर्मात येतो का, हे चाहते पाहत होते. पण विराटने यावेळी चाहत्यांना निराश केले. अर्शदीपच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्यासाठी गेला खरा, पण त्याचे टायमिंग चुकले. त्यामुळे चेंडू वर उडाला आणि मार्को यान्सेनने त्याचा अप्रितम झेल पकडला. यानंतर इतर आरसीबीचे फलंदाज एकामागोमाग बाद होत राहिले आणि त्यामुळे त्यांची 7 बाद 42 अशी दयनीय अवस्था झाली होती. पण टीम डेव्हिड संघाच्या मदतीला धावून आला. टीम डेव्हिडने यावेळी तुफानी फटकेबाजी केली आणि त्यामुळेच आरसीबीला 95 धावांपर्यंत तरी पोहोचता आले. टीमने यावेळी 26 चेंडूंत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर नाबाद 50 धावांची धमाकेदार खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक
आरसीबी 14 षटकांत 9 बाद 95 (फिल सॉल्ट 4, रजत पाटीदार 24, विराट कोहली 1, टीम डेव्हिड नाबाद 26 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारासह नाबाद 50, अर्शदीप सिंग, यान्सेन, चहल व हरप्रीत ब्रार प्रत्येकी दोन बळी)
पंजाब 12.1 षटकांत 5 बाद 98 (प्रियांश आर्या 16, प्रभसिमरन सिंग 13, श्रेयस अय्यर 7, जोस इंग्लिश 14, शशांक सिंग 1, नेहाल वढेरा नाबाद 33, मार्क स्टोनिस नाबाद 7, जोस हेजलवूड 14 धावांत 3 बळी, भुवनेश्वर कुमार 2 बळी).









