गुजरातविरुद्ध आज आरसीबीला गोलंदाजांकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा
वृत्तसंस्था/ बेंगळूर
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघ आज बुधवारी येथे आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्सशी सामना करताना त्यांच्या पुनरागमनाला संस्मरणीय बनवण्याची इच्छा निश्चितच बाळगेल आणि त्यादृष्टीने त्यांना आपले अनुभवी गोलंदाज फॉर्म कायम राखतील, अशी आशा असेल.
कोलकाता आणि चेन्नई या दोन कठीण प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी मोठी भूमिका बजावली होती. परंतु आता टायटन्सविऊद्ध घरच्या मैदानावर त्यांना वेगळ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीची नेहमीच फलंदाजांना साथ लाभलेली आहे आणि ही बाब येथे तीन वेळा 260 पेक्षा जास्त धावसंख्या ज्या प्रकारे नोंदविण्यात आल्या त्यावरून दिसून येते. येथील जवळ असलेल्या सीमा आणि जलद आउटफिल्ड गोलंदाजांच्या अडचणीत भर घालतात.
परंतु रॉयल चॅलेंजर्सना विश्वास असेल की, जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार हे त्यांचे दोन गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखू शकतील. हेझलवूडने या आयपीएलमध्ये प्रति षटक फक्त 5.37 धावा दिल्या आहेत, तर चेन्नई सुपर किंग्सविऊद्धच्या सामन्यासाठी मैदानात परतलेल्या भुवनेश्वरचा इकॉनॉमी रेट 6.6 असा आहे. नवीन चेंडू हाताळणारे प्रभावी गोलंदाज ही गुजरातच्या सक्षम वरच्या फळीचा विचार करता आरसीबीसाठी सर्वांत मोठी अनुकूल बाजू आहे.
गुजरातसाठी कर्णधार शुभमन गिल आणि बी. साई सुदर्शन ही एक चांगली सलामीची जोडी म्हणून विकसित झाली आहे आणि आरसीबी हेझलवूड आणि भुवनेश्वर यांचा वापर करून त्यांना डावाची उभारणी करण्यापासून रोखण्यास उत्सुक असेल. हेझलवूड चेंडू उसळवू शकतो, तर भुवनेश्वर नवीन चेंडू स्विंग करण्याच्या क्षमतेसह फलंदाजांना त्रासदायक अशी अचूक गोलंदाजी करू शकतो. आरसीबीची ही वेगवान जोडी हा एक मोठा धोका आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल देखील त्यांना चांगले साहाय्य करत आहे. तथापि, क्रृणाल पंड्या आणि सुयश शर्मा हेच फिरकी मारा हाताळत असल्याने आरसीबी याबाबतीत थोडासा कमकुवत वाटू शकतो. पंड्या व शर्मा यांच्या कौशल्याची आज कसोटी लागेल.
दुसरीकडे, गुजरातकडे फिरकी गोलंदाजीमध्ये रशिद खान आणि आर. साई किशोर हे दोन सिद्ध खेळाडू आहेत. विराट कोहली, फिल सॉल्ट, कर्णधार रजत पाटीदार, जो फिरकीचा एक उत्तम खेळाडू आहे आणि देवदत्त पडिक्कल या आरसीबी फलंदाजांकडील त्यांचा संघर्ष कुठल्या दिशेने जातो ते पाहावे लागणार असून त्याचा सामन्याच्या निकालावर मोठा परिणाम होईल. गेल्या वर्षीच्या लिलावात आरसीबीमधून गुजरातकडे स्थलांतरित झालेले कागिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज ही वेगवान जोडी बेंगळूरूच्या वरच्या फळीला सुऊवातीच्या काही षटकांत दाबून ठेवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून फिरकी गोलंदाज जास्त दबावाशिवाय त्यांची भूमिका बजावू शकतील.
स्टार फलंदाज कोहली आणि सॉल्ट यांनी गेल्या दोन सामन्यांमध्ये 95 आणि 45 धावांच्या भागीदाऱ्या करताना परिपूर्ण समन्वयाची चिन्हे दाखवली आहेत आणि चिन्नास्वामीवर आज ते आणखी धोकादायक ठरू शकतात. सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या आरसीबीचे एक-दोन फलंदाज गुजरातला लवकर बाद करावे लागतील आणि त्यादृष्टीने त्यांना रबाडाकडून अपेक्षा असेल. रबाडाने सर्व टी-20 सामन्यांमध्ये कोहलीविऊद्ध चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्याने 14 डावांमध्ये त्याला चार वेळा बाद केलेले आहे. थोडक्यात ज्या संघाचे गोलंदाज परिस्थितीशी चांगले जुळवून घेतील त्यांच्या बाजूने निकाल लागण्याची जास्त शक्यता आहे. या सामन्यात पावसाच्या अडथळ्याला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.
संघ : गुजरात टायटन्स-शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, बी. साई सुदर्शन, शाहऊख खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, राहुल तेवतिया, रशिद खान, निशांत सिंधू, महिपाल लोमरोर, कुमार कुशाग्रा, अनुज रावत, मानव सुतार, वॉशिंग्टन सुंदर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद अर्शद खान, गुरनूर सिंग ब्रार, शेरफेन रदरफोर्ड, आर. साई किशोर, इशांत शर्मा, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करिम जनात, कुलवंत खेजरोलिया.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, स्वस्तिक चिकारा, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, फिलिप सॉल्ट, मनोज भंडागे, टिम डेव्हिड, क्रृणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, नुवान तुषारा, लुंगी एनगिडी, यश दयाल, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, मोहित राठी, अभिनंदन सिंग.
सामन्याची वेळ : संध्या. 7.30 वा.









