वृत्तसंस्था /बेंगळूर
22 मार्चपासून 2024 च्या आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या हंगामाला मोठ्या उत्साहाने प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध संघांचे खेळाडू आपल्या सरावाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या (आरसीबी) सराव शिबिराला प्रारंभ झाला. मात्र, या शिबिरात त्यांचा हुकमी खेळाडू विराट कोहली आपली उपस्थिती दर्शवू शकला नाही. आरसीबीमध्ये दाखल होण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बुधवारी या सराव शिबिराच्या पहिल्या दिवशी संघाचे नवे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर तसेच क्रिकेटचे संचालक मो बोबाट यांच्या मार्गदर्शनाखाली संघातील अनेक खेळाडूंनी नेटमध्ये बराचवेळ सराव केला. कर्णधार डु प्लेसिस विंडीजच अल्झेरी जोसेफ तसेच विराट कोहली यांची मात्र गैरहजरी जाणवली. येत्या दोन-तीन दिवसामध्ये कोहली दाखल होईल असे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले.









