वृत्तसंस्था/ बेंगळूर
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरची मजबूत मधली फळी, फॉर्मात असलेली कर्णधार स्मृती मानधना आणि घरच्या प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा ही आज सोमवारी त्यांचा महिला प्रीमियर लीगमध्ये सामना करताना यूपी वॉरियर्ससाठी मोठी आव्हाने असतील.
भारताची उपकर्णधार मानधना जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तिने देश आणि आरसीबीतर्फे खेळलेल्या गेल्या 10 सामन्यांमध्ये पाच अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. पण या हंगामातील पहिला विजय मिळविलेल्या दीप्ती शर्माच्या संघाला ती हलके लेखू पाहणार नाही. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू तहलिया मॅकग्राची जबरदस्त फटकेबाजी स्पर्धेत कधीही परिस्थिती बदलू शकते हे तिला चांगलेच ठाऊक आहे.
तथापि सलग दोन विजयांसह आत्मविश्वासपूर्ण सुऊवात केल्यानंतर आणि गुजरात जायंट्सविऊद्ध भरपूर चेंडू शिल्लक असताना 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठल्यानंतर मंधानाच्या संघाचा आज सामन्यात उतरताना आत्मविश्वास प्रचंड असेल. हरमनप्रीत कौरच्या मुंबई इंडियन्सविऊद्धच्या मागील सामन्यात आरसीबीला धक्का बसला असला, तरी त्यात बेंगळूर संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांची लय हरवल्याप्रमाणे वाटले. मात्र एलिस पेरीने 81 धावांची प्रभावी खेळी केली.
एकूणच आरसीबीने या हंगामात आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे, कारण ते तीन सामन्यांतून चार गुणांसह आघाडीवर आहेत आणि 0.835 इतका त्यांचा ‘नेट रन रेट’ आहे. दुसरीकडे, यूपी वॉरियर्सना चांगली सुऊवात करता आली नाही. पाच संघांच्या लीगमध्ये ते तीन सामन्यांतून दोन गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. याचे कारण म्हणजे भारताची आघाडीची फिरकी गोलंदाज दीप्ती, मॅकग्रा आणि इंग्लंडची दिग्गज सोफी एक्लेस्टोन असूनही संघाची कामगिरी खराब झाली आहे. गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडून लागोपाठ पराभव स्वीकारावे लागल्यानंतर त्यांनी बेंगळूर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीला हरवण्यात यश मिळवले. मात्र आरसीबीचे आव्हान त्यांना जड जाऊ शकते.









