वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आरसीबी संघ यंदाच्या आयपीएलमध्ये इतिहास बदलण्यास आणि वारंवार हुलकावणी देणारे विजेतेपद मिळविण्यास सज्ज झालेला आहे. संघाचा समतोल आणि विराट कोहलीच्या वरच्या फळीतील आश्वासक उपस्थितीमुळे ए. बी. डिव्हिलियर्सला त्याचा माजी क्लब रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यावर्षी त्यांचे पहिले इंडियन प्रीमियर लीग जेतेपद जिंकू शकतो, असा विश्वास वाटत आहे.
लीगच्या सर्वांत ग्लॅमरस संघांपैकी एक आणि जगातील काही सर्वांत स्फोटक फलंदाजांचा समावेश राहिलेल्या आरसीबीने तीनदा अंतिम फेरी गाठली, परंतु प्रत्येक प्रसंगी आयपीएलचा चषक जिंकण्यात ते कमी पडले. रजत पाटीदार या नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली ते 18 व्या सत्रात प्रवेश करतील, तर इंग्लिश खेळाडू फिल सॉल्ट कोहलीचा सलामीचा जोडीदार असेल. ‘मला खरोखर वाटते की, त्यांनी खेळाडूंच्या लिलावात काही आश्चर्यकारकपणे चांगल्या चाली केल्या’, असे आरसीबीसोबत 11 हंगाम घालवलेल्या डीव्हिलियर्सने ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले.
तो एक चांगला, संतुलित संघ आहे. त्याची ’बॅटिंग लाइनअप’ पाहा. ती आधी शुद्ध शक्तीने भरलेली व नंतर शक्ती आणि नियंत्रण यांचे मिश्रण आहे. मला वाटते की, या संघाकडे आगेकूच करण्यासाठी जे काही लागते ते सर्व त्यंना मिळालेले आहे, असे मत डीव्हिलियर्सने व्यक्त केले. लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल आणि टिम डेव्हिड यांच्या समावेशामुळे आरसीबीच्या मधल्या फळीच्या ताकदीत सुधारणा झाली आहे, तर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड वेगवान भुवनेश्वर कुमारच्या साथीला असेल. डीव्हिलियर्स म्हणाला की, कोहलीवर त्याच्या स्ट्राइक रेटबद्दल अनावश्यक टीका झाली आहे.









