विराट कोहलीचे नाबाद शतक वाया, मुंबई इंडियन्स बाद फेरीत
वृत्तसंस्था/ बेंगळूर
शुभमन गिलच्या नाबाद शतकाच्या जोरावर रविवारी येथे पावसाच्या अडथळ्यामुळे उशिरा सुरू झालेल्या बाद फेरीतील शेवटच्या महत्त्वाच्या सामन्यात विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सने यजमान रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा 5 चेंडू बाकी ठेवून 6 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचे बाद फेरीत प्रवेश मिळविण्याचे स्वप्न अधुरे राहिले. तर बेंगळूरच्या पराभवामुळे रविवारच्या पहिल्या सामन्यात हैदराबादचा पराभव करणाऱ्या मुंबई इंडियन्सला बाद फेरीत प्रवेश मिळविण्याची नामी संधी मिळाली. आता या स्पर्धेत गुजरात टायटन्स, चेन्नई सुपरकिंग्ज, लखनौ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ प्ले ऑफ गटात दाखल झाले आहेत. चालू आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत 11 शतके नोंदवली गेली.
विराट कोहलीच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर 2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात यजमान रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने 20 षटकात 5 बाद 197 धावा जमवित विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सला विजयासाठी 198 धावांचे आव्हान दिले आहे. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना गुजरात टायटन्सने 19.1 षटकात 4 बाद 198 धावा जमवित बेंगळूरचे आव्हान सहा गड्यांनी संपुष्टात आणले.

विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सच्या विजयाचा खरा शिल्पकार शुभमन गिल ठरला. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मैदानावर रहात त्याने 52 चेंडूत 8 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 104 धावा झोडपल्या. तर विजय शंकर त्याला चांगली साथ देताना 35 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकाराच्या मदतीने 53 धावा जमवल्या. विजय शंकर आणि गिल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 123 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पार्नेलच्या शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर गिलने विजयी षटकार खेचला. गुजरातच्या डावामध्ये 10 षटकार आणि 15 चौकार नोंदवले गेले. त्यांना अवांतराच्या रुपात 19 धावा मिळाल्या. बेंगळूरतर्फे मोहमद सिराजने 2 तर विजयकुमार विशाख आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
चालू आयपीएल हंगामातील साखळी फेरीतील 70 आणि शेवटचा सामना आहे. मुसळधार पावसामुळे हा सामना तासभर उशिरा सुरू करण्यात आला. गुजरातने नाणेफेक जिंकून बेंगळूरला प्रथम फलंदाजी दिली. बेंगळूरची सलामीची जोडी कर्णधार डु प्लेसिस आणि कोहली यांची या मोसमात फलंदाजी चांगलीच बहरली आहे. या सामन्यात या जोडीने 43 चेंडूत 67 धावांची भागीदारी केली. बेंगळूरने पॉवर प्लेच्या 6 षटकात 62 धावा जमवल्या. तसेच बेंगळूरचे अर्धशतक 27 चेंडूत फलकावर लागले. गुजरातच्या नूर अहमदने डु प्लेसिसला आठव्या षटकात झेलबाद केले. त्याने 19 चेंडूत 5 चौकारासह 28 धावा जमवल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मॅक्सवेल यावेळी अधिक धावा जमवू शकला नाही. रशीद खानच्या फिरकीवर त्याचा नवव्या षटकात त्रिफळा उडवला. त्याने 5 चेंडूत 1 षटकार आणि एक चौकारासह 11 धावा जमवल्या. नूर अहमदने महिपाल लोमरोरला केवळ एका धावेवर साहाकरवी यष्टीचित केले. बेंगळूरचे शतक 65 चेंडूत फलकावर लागले तर कोहलीने 35 चेंडूत 7 चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. ब्रेसवेल आणि कोहली यांनी चौथ्या गड्यासाठी 47 धावांची भागीदारी केली. मोहमद शमीने स्वत:च्याच गोलंदाजीवर ब्रेसवेलला टिपले. त्याने 16 चेंडूत 5 चौकारासह 26 धावा जमवल्या. यष्टीरक्षक दिनेश कार्तिक खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद झाला. बेंगळूरची यावेळी स्थिती 14.2 षटकात 5 बाद 133 अशी होती. कोहलीला अनुज रावतकडून अखेरपर्यंत साथ मिळाली. या जोडीने सहाव्या गड्यासाठी अभेद्य 64 धावांची भागीदारी केल्याने बेंगळूरला 197 धावापर्यंत मजल मारता आली. कोहलीने 61 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारासह नाबाद 101 तर रावतने 15 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 23 धावा जमवल्या. बेंगळूरला अवांतराच्या रुपात 7 धावा मिळाल्या. बेंगळूरच्या डावामध्ये 3 षटकार आणि 25 चौकार नोंदवले गेले. गुजराततर्फे नूर अहमदने 39 धावात 2 तर शमी, रशीद खान आणि यश दयाल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
बेंगळूरने पहिल्या 1 ते 6 षटकामध्ये 62 धावा जमवल्या. त्यानंतर 7 ते 15 षटकामध्ये 74 धावा जमवताना 5 गडी गमवले. तसेच 16 ते 20 षटकामध्ये त्यांनी एकही गडी न गमवताना 61 धावा जमवल्या.
विराट कोहलीचे 2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील हे सलग दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात शतक झळकवले होते. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासामध्ये आता कोहलीच्या नावावर सर्वाधिक म्हणजे 7 शतके असून तो अग्रस्थानावर आहे. विंडीजच्या ख्रिस गेलने 6, तर जोस बटलरने 6 शतके झळकवली आहेत.
संक्षिप्त धावफलक : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर 20 षटकात 5 बाद 197 (कोहली 61 चेंडूत नाबाद 101, डु प्लेसिस 19 चेंडूत 28, मॅक्सवेल 5 चेंडूत 11, लोमरोर 1, ब्रेसवेल 16 चेंडूत 26, अनुज रावत 15 चेंडूत नाबाद 23, अवांतर 7, नूर अहदम 2-39, शमी 1-39, यश दयाल 1-39, रशीद खान 1-24).
गुजरात टायटन्स 19.1 षटकात 4 बाद 198 (साहा 14 चेंडूत 12, गिल 52 चेंडूत नाबाद 104, विजय शंकर 35 चेंडूत 53, शनाका 0, मिलर 6, राहुल तेवातिया नाबाद 4, अवांतर 19, मोहमद सिराज 2-32, विजयकुमार विशाख 1-40, हर्षल पटेल 1-29).









